CoronaVirus in Khamgaon : बाहेरगावहून आलेल्या हजारावर नागरिकांची तपासणी अपूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 12:05 PM2020-03-27T12:05:25+5:302020-03-27T12:08:22+5:30
खामगाव तालुक्यातील ९७ गावांमध्ये सुमारे साडेतीन हजारापेक्षा अधिक जण बाहेरगावहून दाखल झालेत.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने देशात सोमवारपासून लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, तत्पूर्वीच खामगाव तालुक्यातील ९७ गावांमध्ये सुमारे साडेतीन हजारापेक्षा अधिक जण बाहेरगावहून दाखल झालेत. यापैकी सोमवार २३ मार्चपर्यंत २२८२ जणांची तपासणी करण्यात आली. उर्वरित १२७४ जणांची तपासणी अपूर्ण असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या अनुषंगाने खबरदारी उपाययोजना म्हणून रविवार २२ मार्च रोजी जनता संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर सोमवारपासून २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू करण्यात आला. दरम्यान, २३ मार्च रोजीपर्यंत खामगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची माहिती महसूल आणि आरोग्य प्रशासनाकडून अपडेट केली जात आहे. तसेच कोरोना(कोविड-१९)च्या अनुषंगाने गावाबाहेरून आलेल्यांची तपासणी तालुका आरोग्य विभागाकडून केली जात आहे. २३ मार्च २०२० पर्यंत खामगाव पंचायत समितीअंतर्गत ९७ गावांमध्ये ३०४५ जण बाहेरगावहून आले. यापैकी २०७३ जणांची तपासणी करण्यात आली होती. तर ९७२ जणांची तपासणी बाकी होती. दरम्यान, सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी देखील अनेकजण बाहेरगावहून विविध गावांमध्ये आले. त्यामुळे खामगाव तालुक्यात बाहेरगावहून आलेल्यांची संख्या साडेतीन हजारावर पोहोचल्याची खात्रीलायक माहिती आहे. यापैकी २२८२ जणांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून १२७४ जणांची तपासणी अपूर्ण होती.
चौकट...
पळशी बु. येथे सर्वाधिक संख्या!
खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे बाहेरगावहून आलेल्यांची संख्या ही तालुक्यात सर्वाधिक आहे. या ठिकाणी १३७ जण बाहेरगावहून आलेत. याठिकाणच्या सर्वच १३७ जणांची तपासणी २३ मार्चपर्यंत अपूर्ण होती. त्यानंतर घाटपुरी येथे १३१ जण बाहेरगावहून आलेत. यापैकी ९२ जणांची तपासणी पूर्ण झाली. तर ३९ जणांची तपासणी अपूर्ण आहे. सुटाळा खुर्द येथे ८२, कोलोरी आणि शहापूर येथे ८० तर हिवराखुर्द येथे ७० जण आणि पिंपळगाव राजा येथे ६४ जण तर बोथाकाजी येथे ५५ जण बाहेरगाव येथून आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
----------