CoronaVirus : नऊ कोवीड केअर सेंटर वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:43 AM2020-09-26T11:43:31+5:302020-09-26T11:43:51+5:30
बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर येथे प्रत्येकी एक कोवीड केअर सेंटर वाढविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोवीड केअर सेंटरमध्येही संदिग्धांना जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोणातून प्रशासकीय पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात १८ कोवीड केअर सेंटर कार्यरत असून त्यांची क्षमता ही ३,२२५ खाटांची आहे. नऊ कोवीड सेंटर कार्यान्वीत झाल्यास जवळपास दीड हजार खाटा अधिकच्या उपलब्ध होणार आहेत.
त्यानुषंगाने जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात शहरी तथा ग्रामीण भागातील मोठ्या गावात कोवीड केअर सेंटरसाठी जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी त्यानुषंगाने पाहणी करण्यात आली असून नव्याने उभारावयाच्या नऊ कोवीड केअर सेंटर पैकी पाच कोवीड केअर सेंटरसाठी जागा अधिग्रहीत करण्यात आली आहे. मात्र अद्याप या ठिकाणी प्रत्यक्षात हे सेंटर कार्यान्वीत झालेले नाही. संदिग्धांची वाढती संख्या विचारात घेता गरजेनुरूप प्रत्यक्षात ही केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले तर उर्वरित चार जागांच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सद्या सुरू आहे.
बुलडणा जिल्ह्यात वर्तमान स्थितीत १३ ही तालुक्यात १८ कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत असून त्यामध्ये संदिग्ध रुग्णांसह ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची नगण्य लक्षणे किंवा सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांना ठेवण्यात येत आहे. वर्तमान स्थिती जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा साडेसहा हजारांच्या टप्प्यात आला आहे. अॅक्टीव्ह रुग्णांची संख्याही एक हजाराच्या पुढे आहे. त्यामुळे येत्या काळात कोवीड केअर सेंटरची क्षमताही वाढवावी लागणार आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने हे नियोजन सुरू केले आहे.
यामध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, मलकापूर येथे प्रत्येकी एक कोवीड केअर सेंटर वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोवीड केअर सेंटरची संख्या २७ होणार आहे.