CoronaVirus : तपासणीशिवाय गावात प्रवेश नाही; जनजागृतीसाठी दवंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 04:49 PM2020-03-18T16:49:41+5:302020-03-18T16:49:47+5:30
शेलोडी येथे बाहेरगावहून (प्रामुख्याने पुणे आणि मुंबई) येथून येणाऱ्यांनी तपासणी शिवाय गावात प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभरात खळबळ माजवली आहे. महाराष्ट्रातही या आजाराचा प्रसार होत असल्याचे दिसून येते. बाहेर गावहून येणाऱ्यांमुळे हा आजार बळावत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे बाहेरगावहून (प्रामुख्याने पुणे आणि मुंबई) येथून येणाऱ्यांनी तपासणी शिवाय गावात प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे. शिवाय कोरोनाबाबत खबरदारी म्हणून गावात दंवडी देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
कोरोना व्हायरस या आजारामुळे मुंबईत एका रूग्णाचा मृत्यू झाला. पुणे येथेही या आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या आजाराचा झपाट्याने प्रसार होत असल्याने, राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या शिवाय प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नगर पालिका, नगर पंचायती आणि ग्रामपंचायतींना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खामगाव तालुक्यातील शेलोडी येथे दवंडी देऊन जनजागृती केली जात आहे. यामध्ये गावात स्वच्छता राखणे, गर्दी करण्यास मज्जाव केला आहे. सर्दी,खोकला आणि ताप आल्यास तात्काळ उपचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाहेरगावहून आलेल्यांची माहिती द्या!
कोरोना या विषाणूजन्य आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी बाहेरगावहून म्हणजेच पुणे, मुंबई, नागपूर आणि विदेशातून येणाºयांची तात्काळ माहिती ग्रामपंचायतीला दिली जावी. तसेच बाहेर गावहून गावात येणाºया नागरिकांना तपासणीशिवाय गावात प्रवेश दिला जावू नये, असे दवंडीद्वारे सुचित करण्यात आले आहे.
जगभर कोरोना या विषाणूजन्य आजाराची लागण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर गावात दवंडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पुणे, मुंबई आणि विदेशातून गावात येणाºयांनी तपासणीशिवाय गावात येऊ नये, असे आवाहन केले आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्रामपंचायतकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
- संतोष येवले
सरपंच, शेलोडी ता. खामगाव.