Coronavirus : खामगावात कोरोनाबधित महिलेचा मृत्यू, सुल्तानपुरात एक पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:39 PM2020-05-18T21:39:42+5:302020-05-18T21:40:55+5:30
Coronavirus : खामगावात कोरोनाबधित महिलेचा मृत्यू, सुल्तानपुरात एक पॉझिटिव्ह आढळून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव/ जळगाव जामोद : बुुलडाना जिल्ह्यात दोन दिवसानंतर सोमवारी दुपारी आलेले तब्बल ५७ अहवाल निगेटिव्ह आल्याची दिलासादायक स्थिती असताना सायंकाळी जळगावातील सुलतानपुºयातील कोरोना संदिग्ध मृत व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान ठाण्याहून आलेल्या खामगावातील ६० वर्षीय पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाबाधितांची संख्या ३० झाली असून तिघांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. दोन दिवसापूर्वी खामगाव, शेगाव व नरवेल येथे तिघेजण पॉझिटिव्ह आले होते. चार दिवसापूर्वी मलकापूर पांग्रा येथे एका मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर जळगाव येथे १० मे रोजी एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला होता. शुक्रवारी १६ मे रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास जळगाव येथील ७२ वर्षीय कोरोना संदिग्ध व्यक्तीचा खामगाव येथे कोविड रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्याच्यावर वैद्यकीय प्रोटोकॉल नुसार अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सदर मृत व्यक्ती गुरुवारी पुण्यावरून जळगाव जामोद मध्ये आला होता. दरम्यान त्याला तीव्र स्वरूपाच्या तापा सह श्वास घेण्यास त्रास होत होता. या व्यतिरिक्त त्यास मधुमेह, हृदयरोग व तत्सम आजार होते. या पृष्ठभूमीवर सुलतानपुरा परिसर सील करण्यात आला. सुलतानपुºयासह सभोवतालचा परिसर कंटेनमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून या झोनमध्ये नगर परिषदेच्यावतीने सॅनीटायझेशनची फवारणी करण्यात आली. आ. डॉ. संजय कुटे, नगराध्यक्षा सीमाताई डोबे यांच्यासह उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, मुख्याधिकारी डॉ. आशिष बोबडे, ठाणेदार सुनील जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वलाताई पाटील व डॉ. सावंत राठोड यांनी कंटेनमेन्ट झोनमध्ये पोहोचून नागरिकांना धीर दिला.
ठाण्याहून खामगावात आलेल्या ‘त्या’ वृद्धेचा अखेर मृत्यू
खामगाव शहरातील समन्वय नगर भाग २ मध्ये नातेवाईकांकडे ठाण्याहून आलेल्या ६० वर्षीय वृद्धेचा सोमवारी अखेर मृत्यू झाला. शनिवारी ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर तिला कोविड रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. अखेर या महिलेचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला. ती अन्य आजारांनी ग्रस्त असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तिच्यावर बर्डे प्लॉटमधील दफनभूमीमध्ये दफनविधी पार पाडण्यात आला. प्रशासनातर्फे या भागात आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढले असून नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे झाले आहे.