CoronaVirus : एसी बसमध्ये ‘पेस्ट कंट्रोल’; शिवशाहीमध्ये सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:05 PM2020-03-21T12:05:57+5:302020-03-21T12:06:05+5:30
शिवशाही बसेसमध्ये सॉनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर एसटी महमंडाळाकडून सतर्कता बाळगली जात आहे. त्यासाठी बसस्थानकावर कर्मचाऱ्यांसाठी लिक्वीड, साबनाची व्यवस्था करण्यात आली आहे. एसी बसमध्ये ‘पेस्ट कंट्रोल’ करण्यात येणार असून, सर्व शिवशाही बसेसमध्ये सॉनिटायझर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोरानाची धास्ती सर्वांनाच निर्माण झाली आहे. त्यामुळे गर्दी होणारे बहुतांश ठिकाण बंद करण्यात आले आहेत. परंतू बसस्थानक अत्यंत गर्दीचे ठिकाण असल्याने येथे विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाल्याने शहराच्याठिकाणी बाहेरगावी असलेले काही कुटुंब गावाकडे परत येत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद याठिकाणी राहणे अनेक विद्यार्थी सुद्धा गावाकडे परतत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजना म्हणून राज्य परिवहन महामंडळाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यात एकूण सात आगार असून या आगारांतर्गत येणारे सर्व बसस्थानक निर्जंतूक करण्यात येत आहेत. किटक व जंतू नष्ट करण्यासाठी ‘पेस्ट कंट्रोल’ करण्यात येते. त्यामुळे आजारावर नियंत्रण मिळविल्या जाऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर एसी बसेसमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात येणार आहे. बसमधील सर्व आसन पेस्ट कंट्रोल करण्यात येणार आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात धुणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांसाठी लिक्वीड व साबणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी शिवशाही बसेसमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे १७ शिवशाही बसेसमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे.
तीन लाखांवर खर्च
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांवर आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च आतापर्यंत करण्यात आला आहे. त्यामध्ये बसस्थानक जंतूनाशक औषधाने धुण्यापासून ते एसटी चालक वाहक कर्मचाºयांना मास्क देणे, बसमध्ये सॅनिटायझर ठेवणे आदी उपाययोजनांसाठी हा खर्च करण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बसस्थानकावर विशेष काळजी घेण्यात येत आहे. सर्व बसस्थानक निर्जंतूक करण्यात आले आहेत. पेस्ट कंट्रोल व शिशाहीमध्ये सॅनिटायझर उपलब्ध करण्यात येणार आहे.
-संदिप रायलवार,
विभाग नियंत्रक, बुलडाणा.