Coronavirus : सुखद..बुलडाण्यातील आणखी पाच जणांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 02:04 PM2020-04-20T14:04:29+5:302020-04-20T16:36:49+5:30
बुलडाण्यातील आणखी पाच जणांनी कोरोनावर मात केली.
बुलडाणा: तीन दिवसानंतर बुलडाणा जिल्ह्याला पुन्हा दुसरा सुखद धक्का बसला असून जिल्ह्यातील आणखी पाच जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना मुक्त झालेल्या या पाच जणांना २० एप्रिल रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने चिखली, देऊळगाव राजा, शेगाव, चितोडा (खामगाव) आणि बुलडाणा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. परिणामी वर्तमानस्थितीत बुलडाणा येथील कोरोना रुग्णालयात आता १२ पॉझीटीव्ह रुग्ण राहले असून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात आणखी एखादा सुखद धक्का बुलडाणा जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, २० एप्रिल रोजी सोडण्यात आलेले पाच जणांपैकी काहींचे दिल्ली कनेक्शन होते. बुलडाणा जिल्ह्यातील दिल्ली कनेक्श्न असलेल्या ४८ जणांना ताब्यात घेण्यता आले होते. त्यापैकी चार जणांना कोरोनाची लागण झालेली होती. त्यातील बरे झालेल्यांना सोमवारी सोडण्यात आले. दरम्यान, आता बुलडाणा जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या ही आठवर पोहोचली आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकूण २१ जण प्रारंभी कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी एकाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात २० जणांवर बुलडाणा येथे उपचार करण्यात येत होते. तर पहिल्या कोरोना पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील चार जणांनाही नंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील तिघांना १७ एप्रिल रोजी सुटी देण्यात आली होती. त्यानंतर २० एप्रिल रोजी जिल्ह्यातील दहा कंटेन्मेंट झोनपैकी पाच कंटेन्मेंट झोनमधील अर्थात चिखली, शेगाव, देऊळगाव राजा, बुलडाणा आणि खामगाव तालुक्यातील चितोडा येथील प्रत्येकी एकाला ते कोरोना मुक्त झाल्याने दुपारी सव्वा बारा वाजता सोडण्यात आले. आता त्यांना १४ दिवस होम क्वारंटीन रहावे लागणार आहे. तसे शिक्केही त्यांच्या हातावर मारण्यात आले आहेत.
रेड झोन बाबत २८ दिवसांनी निर्णय
राज्यातील १४ जिल्हे हे कोरोना हॉटस्पाट म्हणून समोर आले आहेत. अर्थात हे सर्व जिल्हे रेड झोनमध्ये असून त्यात बुलडाणा जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातील आठ जण बरे झाल्यामुळे बुलडाणा जिल्हा रेड झोनमधून लवकरच बाहेर येण्याची शक्यता असली तरी त्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात आगामी २८ दिवस एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून न आल्यास त्याबाबत विचार होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी सांगितले. आॅरेंज झोनमध्ये जाण्यासाठी आणखी काही निकषांचीही बुलडाणा जिल्ह्यास पुर्तता करावी लागणार आहे.
‘त्या’ ट्रक चालकाच्या संपर्कातील व्यक्तींचे ट्रेसिंग सुरू
तेलंगाणातून आंब्यांचा ट्रक घेऊन बुलडाणा जिल्ह्यातून गेलेल्या कथित स्तरावरील कोरोना पॉझीटीव्ह ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. पैकी एकाला क्वारंटीन करण्यात आले असून आणखी काही जणांनाही यात क्वारंटीन केले जाण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही, असे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.