CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात सात जणांचे 'स्क्रीनींग'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 11:06 AM2020-03-14T11:06:47+5:302020-03-14T11:06:54+5:30
एकही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा एकही पॉझीटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती देतांनाच संशयावरून जिल्ह्यातील सात जणांचे स्क्रीनींग आरोग्य विभागाने केले असून सुदैवाची बाबा म्हणजे यात एकही कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत व डॉ. कुटुंबे यांनी स्थानिक पत्रकार भवनाच्या सभागृहात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन आणि राज्य संघटनेचे राजेंद्र काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यात दोन दुबाई, एक इटली, दोन चीन, एक दिल्ली व एक कर्नाटकमधून आलेल्या अशा एकूण सात जणांचे स्क्रीनींग आरोग्य विभागाकडून करण्यात आले असून त्यांना कोरोनाचा कुठलाही प्रादुर्भाव झालेला नाही. रोम (इटली) येथून सहा मार्च रोजी आलेल्या व्यक्तीचेही रिपोर्टर्स नार्मल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक न होता प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन केले. कोरोनावर उपचार नसले तरी खबरदारी हाच सर्वात मोठा उपचार असल्याचे सांगत या आजाराचा रिस्क पिरेड हा साधारणत: १४ दिवसाचा असल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क असून बुलडाणा, शेगाव, खामगाव येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाही त्यादृष्टीने सक्रीय आहे. उष्ण वातावरणात हा विषाणू फारकाळ टिकाव धरू शकत नाही, त्यामुळे आगामी २० दिवस सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खबरदारी घेण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. त्यानंतर एका अंदाजनुसार या आजाराचा धोका कमी होईल, असे सांगत साधारणत: ४५ वर्षावरील व्यक्तीं आतापर्यंत या आजारामुळे जगभरात बाधीत झालेल्या आहेत तर या आजाराचा मृत्यू दर हा २.५ टक्के ते तीन टक्के आहे. मात्र अन्य विषाणूपेक्षा या विषाणूचा फैलाव हा वेगाने झाला असल्याचे आतापर्यंत झालेल्या अभ्यासातून स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.