CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात सहा नवे रुग्ण; ३० जणांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 10:44 AM2020-06-06T10:44:15+5:302020-06-06T10:44:26+5:30
जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असून शुक्रवारी पुन्हा सहा नव्या रुग्णांची यात भर पडली
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा सातत्याने वाढत असून शुक्रवारी पुन्हा सहा नव्या रुग्णांची यात भर पडली आहे. शेलापूर येथील दोन, पलढग, बुलडाणा, मलकापूर आणि खामगाव येथील प्रत्येकी एकाचा यात समावेश आहे.
परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा हा ८३ वर पोहोचला असून सध्या ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मोताळा तालुक्यात तीन नवे रुग्ण आढळून आले असून ते मुंबईवरून ते एका वाहनाद्वारे आले होते. दरम्यान या वाहनाच्या चालकाचा व त्यातील अन्य प्रवाशांचाही आरोग्य यंत्रणा सध्या शोध घेत आहे तर मोताळा तालुक्यातीलच पलढग येथी १९ वर्षाची युवती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. खामगावात पुरवार गल्लीमधील पॉझिटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तीची पत्नीही पाच जून रोजी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. सुदैवाने हे दोघेही खामगाव आयसोलेशन कक्षात असल्याने पुढील धोका टळला आहे.
बुलडाणा येथील महिला ही मुंबईवरून ३१ मे राजी आली होती. शंका म्हणून या महिलेने तिचा स्वॉब तपासणीसाठी दिला होता. तो पॉझिटिव्ह आल्यामुळे तिच्यासह कुटुंबातील चार जणांना आयसोलेशनमध्ये हलविण्यात आल आहे. मुंबईमधील विरार परिसरातील सरकारी रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत होती. मुळची बुलडाण्याची असल्याने ती परत आली होती. पलढग येथील युवती ही शेलापूर येथे आधी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांच्या संपर्कात आली होती. त्यामुळे आता शेलापूर गाव परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ८२ झाली असून यापैकी ५० रुग्णांना सुटी देण्यात आली असून सध्या २९ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.
१३ पैकी ११ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव
बुलडाणा जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झला असून देऊळगाव राजात तीन, चिखलीमध्ये चार, सिंदखेड राजामध्ये सात, शेगावात पाच, जळगाव जामोदमध्ये दोन, मोताला तालुक्यात आठ, नांदुरा तालुक्यात पाच आणि संग्रामपूर तालुक्यात एक या प्रमाणे आतापर्यंत रुग्णांची नोंद झाली आहे. लोणार आणि मेहकर तालुक्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही मलकापूर, खामगावने आता चिंता वाढवली आहे.
बुलडाण्यातील महिलेने वाढवली चिंता
बुलडाण्यातील कोरोना पॉझिटव्ह महिलेच्या कुटुंबियांना क्वारंटीन करण्यात आले आहे. ३३ वर्षीय ही महिला आई व दोन मुलींसह वावरे ले आऊटमध्ये राहते. तिच्या शेजारीच राहणाऱ्या दोन भावांच्या कुटुंबियांनाही क्वारंटीन करण्यात आले आहे. दरम्यान, या महिलेला बुलडाण्यात घेवून येण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. या व्यक्तीकडे अनेकांचे कपडे प्रेससाठी येतात. त्याचा संपर्कही दांडगा आहे. त्यातच या महिलेच्या घरी धुणीभांडी करणारी एक महिला ही असून तिचाही परिसरात अनेक घरी राबता होता. त्यामुळे आता बुलडाणेकरांची चिंता वाढवली आहे.