CoronaVirus : खामगाव शहरात निर्जंतुकीकरण द्रावणाची फवारणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 03:06 PM2020-03-24T15:06:57+5:302020-03-24T15:07:26+5:30
पालिका प्रशासनाच्यावतीने शहराच्या विविध भागात फवारणीस सुरूवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खामगाव शहरातील विविध वार्डात आणि मुख्य रस्त्यावर केमिकलची फवारणी केली जात आहे. सोमवारी सायंकाळपासून पालिका प्रशासनाच्यावतीने शहराच्या विविध भागात फवारणीस सुरूवात करण्यात आली.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर पालिका प्रशासन सक्रीय झाले असून, सोमवारी सायंकाळी शहर पोलिस स्टेशन, महावीर चौक, गांधी चौक, जगदंबा चौक, फरशी भागात केमिकल आणि ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सकाळी शिवाजी नगर, शिवाजी वेस, सिव्हील लाईन परिसरात केमिकल आणि ब्लिचिंग पावडर मिश्रीत रसायनाची फवारणी करण्यात आली. शहराच्या विविध भागात आरोग्य आणि अग्नीशमन विभागाचे पथक कामाला लागले आहे. अग्नीशमन विभागाच्या एका गाडीसह चार टॅक्टर आणि आरोग्य विभागातील वार्ड प्युन रसायनाच्या फवारणीसाठी आपल्या दुचाकीचा वापर करीत आहेत. दुचाकीवरील वार्डप्युन एका पंपाच्या आधारे आपल्या वार्डात रसायनाची फवारणी करीत आहेत.
शहराच्या गल्लीबोळीत होणार फवारणी!
कोरोना खबरदारी आणि उपाययोजनेच्या अनुषंगाने शहरातील प्रत्येक वार्डात आणि वार्डातील प्रत्येक गल्ली आणि बोळीत रसायन फवारणी करण्याचे निर्देश मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिले आहेत.