Coronavirus : बुलडाण्यातील रविवारचा आठवडी बाजार स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 09:18 PM2020-03-14T21:18:21+5:302020-03-14T21:18:25+5:30
Coronavirus :केवळ १५ मार्च रोजीच्या बुलडाणा आठवडी बाजारासंदर्भातच हा आदेश निर्गमित करण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे.
बुलडाणा: कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीकोणातून बुलडाणा शहरात रविवारी १५ मार्च रोजी भरणारा आठवडी बाजार स्थगित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी त्यासंदर्भात रात्री उशिरा आदेश निर्गमीत केले आहेत.
बुलडाणा येथे सौदी अरेबियातून आलेल्या कथित कोरोनाच्या संशयित रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी बुलडाणा बाजार आणि यात्रा कायदा १८६२ च्या कलम पाचच्या अधिकाराचा वापर करून आठवडी बाजार स्थगित केला आहे. केवळ १५ मार्च रोजीच्या बुलडाणा आठवडी बाजारासंदर्भातच हा आदेश निर्गमित करण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. तोही फक्त १५ मार्च २०२० या दिवसापुरताच मर्यादीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे नागरिकांनी घाबरून जावू नये. आरोग्य विभागने जारी केलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधात्कम उपाययोजनांचा नागरिकांनी आधार घ्यावा. सोबतच गर्दीची ठिकाणी टाळावी तथा परिसराच्या स्वच्छतेसोबतच वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.