CoronaVirus : बुलडाण्यातील २० हजार घरांचे होणार सर्व्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:53 AM2020-03-30T11:53:12+5:302020-03-30T11:53:20+5:30
शहरातील ९० हजार नागरिकांची प्रसंगी आरोग्य तपासणी ही केली जाण्याची शक्यता आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना विषाणूच्या संसर्गाने मृत्यू पावलेला व्यक्ती बुलडाणा शहरातील अनेकांच्या संपर्कात असल्याचे समोर येत असून त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग मृत व्यक्तीच्या संपर्कातील जवळ््याच व्यक्तींना आयसोलेशन आणि हॉस्पीटल क्वारंटाईनमध्ये ठेवणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दुसरीकडे या उपाययोजनेसोबतच बुलडाणा शहरात असलेल्या जवळपास २० हजार घरांचा आरोग्याच्या दृ््ष्टीने सर्व्हे करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या असून प्रसंगी शहरातील ९० हजार नागरिकांची प्रसंगी आरोग्य तपासणी ही केली जाण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या असून बुलडाण्यात कोरोना संसर्गाने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृ्ष्ण कांबळे, पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे व अन्य काही अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेण्यात येऊन त्यात ही आपत्कीलन परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने कृती आराखडा आखण्यात आला आहे. त्यानुषगाने आरोग्य विभाग आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अॅक्टीव्ह सर्व्हीलेन्स मोडवर आला आहे.
मृत व्यक्तीच्या ज्या व्यक्ती एक मिटर पेक्षा कमी अंतावरून संपर्कात आल्या असतील त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार आयासोलेशन व प्रसंगी हॉस्पीटल क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मृत व्यक्ती कोणा कोणाच्या संपर्कात आला आहे याचीही माहिती आता संकलीत करण्यात येत असून अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना हॉस्पीटल क्वारंटीन आणि प्रसंगी होम क्वारंटीन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.