CoronaVirus : मलकापूरात दुर्धर आजाराच्या रुग्णांचे घेणार स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 11:25 AM2020-06-28T11:25:13+5:302020-06-28T11:25:22+5:30
दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तीचे स्वॅब, आॅक्सीजन लेव्हलसह मधुमेह, ह्रदयाचे ठोके व तत्मस तपासण्या करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्याचा हॉटस्पॉट बनलेल्या मलकापूर तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी गांभिर्यपूर्वक हालचाली सुरू केल्या असून तालुक्यात दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तीचे स्वॅब, आॅक्सीजन लेव्हलसह मधुमेह, ह्रदयाचे ठोके व तत्मस तपासण्या करण्याची मोहिम हाती घेतली आहे. सोबतच प्रसंगी अशा दुर्धर आजार असणाºया संदिग्ध रुग्णांना ४८ तास विलगीकरण कक्षात ठेवण्याचाही निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीही ‘लोकमत’शी बोलताना या वृत्तास दुजोरा दिला आहे.
शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा व अन्य काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात येवून अनुषंगीक निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान या मोहिमेची व्यापकता वाढवितांना अगोददर त्याच्या यशस्वीतेसोबच प्रायोगिक तत्वावर एखाद्या पॉकेटमध्ये हा उपक्रम राबवून त्याच्या निष्कर्षानंतर हा उपक्रम हाती घेणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिक व्यक्त करत आहेत. अर्थात व्यावहारीक स्तरावर याची चाचपणी गरजेची असल्याचे काहींचे मत आहे. हे मॅकेनिझन विकसीत करण्याची गरज आहे. किंवा दुर्धर आजार असणाºया व्यक्तींची ज्या डॉक्टरांकडे ट्रिटमेंट सुरू आहे, अशा डॉक्टरांशी टायअप करून उपक्रमाची वारंवारीता व यशस्वीता वाढविल्या जावू शकते, असे सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताा सांगितले. मलकापूर तालुक्यात आतापर्यंत ६८ कोरोना बाधीत रुग्ण सापडले असून यापैकी ५० रुग्ण बरे झाले असून सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. संपूर्ण मलकापूर तालुक्यातीलच दुर्धर आजार असलेल्या रुग्णांचे स्वॅब नमुने तपासण्याची चाचपणी करण्यात येत आहे.
९२ व्यक्तींना दुर्धर आजार
मलकापूर तालुक्यातील प्रतिबंधीत क्षेत्रात ९२ व्यक्तींना दुर्धर आजार असून त्यांची प्राधान्य क्रमाने चाचणी करण्यात येणार आहे. त्याचे मॅकेनिझम अधिकाºयांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ठरविण्यात येणार आहे. यासंदर्भात २७ जून रोजी दुपारी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर बैठकही घेण्यात आली असल्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. मलकापूरमध्येही सायंकाळी महत्त्वाची बैठक होऊन त्यात काही मुद्द्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सीमा सिल करण्याचा विचार
मलकापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून प्रसंगी मलकापूर शहर व तालुक्याच्या सीमा सील करण्याच्या दृष्टीनेही विचार करण्यात येत असल्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मलकापूर शहरात पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी २७ जून रोजी रात्री एक बैठकही घेतली.
मलकापूरचा मृत्यूदर १० टक्के
मलकापूर तालुक्यात आतापर्यंत सात व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यापैकी सहा मृत्यू हे मलकापूर शहरातील आहेत. त्यामुळे मलकापूर तालुक्याचा कोरोना बाधीतांचा मृत्यूदर हा १० टक्क्यांच्या आसपास आहे. एकट्या जून महिन्यात मलकापूर तालुक्यात ५३ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून जवळपास दहा रुग्णांवर सध्या आयसोलेशन कक्षात उपाचर करण्यात येत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे मलकापूर शहरात २७ जून रोजी पुन्हा पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना संसर्गाचा उद्रेक अद्यापही सुरू असल्याचे एकंदरीत चित्र पहावयास मिळत आहे.