CoronaVirus : बुलढाण्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 02:21 PM2020-04-27T14:21:06+5:302020-04-27T14:22:45+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे.
बुलढाणा: नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून बुलढाण्यात धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या 11 जणांपैकी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुलढाणा येथे 20 मार्च पासून धार्मिक कार्यासाठी या सर्व व्यक्ती आल्या होत्या. दरम्यान , या अकरा जणांचे 25 एप्रिल रोजी अकोला येथील प्रयोगशाळेत स्वाब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी यास दुजोरा दिला आहे.
परिणामी बुलढाणा जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे. दरम्यान यापैकी पंधरा जणांना आतापर्यंत बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर आठ जणांवर सध्या covid-19 रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता शेगाव खामगाव देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा हे तालुके कोरोना मुक्त झालेले आहेत. सिंदखेड राजा येथील एकास सोमवारी दुपारी covid-19 रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. त्याच दरम्यान बुलढाणा शहरात कामठी येथील 11 जणांपैकी तीनजण कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याचे वृत्त धडकले. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल तेरा दिवसानंतर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यापूर्वी 13 एप्रिल रोजी मलकापूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता.