CoronaVirus : बुलढाण्यात तिघांचे नमुने निगेटिव्ह, सोळा स्वॅब नमुन्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 10:15 AM2020-04-03T10:15:57+5:302020-04-03T12:23:20+5:30
CoronaVirus : बुलढाणा जिल्ह्यातून आतापर्यंत 69 जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते.
बुलढाणा : संभाव्य कोरोना बाधित रुग्णांचे पाठवण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी 3 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्यापही सोळा स्वॅब नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून आतापर्यंत 69 जणांचे स्वॅब नमुने पाठविण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत 53 नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले आहे. अद्याप सोहळा नमुन्यांचे अहवाल बाकी आहेत. वर्तमान स्थितीत बुलढाणा शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच आहे. यातील एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मृत व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्तींचा समावेश आहे. गुरुवारी दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या 17 पैकी 15 जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 110 संशयितांची तपासणी करण्यात आली असून 111 जण सध्या विलगीकरण कक्षामध्ये आहेत. दुसरीकडे बुलढाणा शहरातील 23 हजार 815 हाय रिस्क झोनमधील मधील नागरिकांपैकी चौदा हजार 500 नागरिकांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये चार हजार घरांची तपासणी पूर्ण झाली आहे . त्यामध्ये सर्दी आणि तापाचे लक्षण असलेल्या 56 जणांवर आरोग्य विभागाने औषधोपचार सुरू केला आहे.