बुलडाणा जिल्ह्यातील जनजीवन होतेय सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 10:46 AM2020-06-09T10:46:19+5:302020-06-09T10:46:44+5:30
मिशन बिगीन अंतर्गत तिसऱ्या टप्प्यास आठ जून पासून प्रारंभ झाल्यांनंतर बुलडाणा जिल्ह्यात जनजीवन सुरळीततेच्या दिशने जात असल्याचे चित्र दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मिशन बिगीन अंतर्गत तिसऱ्या टप्प्यास आठ जून पासून प्रारंभ झाल्यांनंतर बुलडाणा जिल्ह्यात जनजीवन सुरळीततेच्या दिशने जात असल्याचे चित्र दिसून आले.
सोमवारी जिल्ह्यातील बहुतांश बाजारपेठा उघडलेल्या दिसल्या. बुलडाणा, लोणार, मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, खामगावसह ग्रामीण भागातही बाजारपेठांमध्ये नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे जिल्ह्याचे अर्थचक्र गतीमान होण्यास प्रारंभ झाला आहे.
अस्थायी विक्रेते, छोटे व्यवसाय करणारे, सराफा दुकानांसमोर पोत ओवून देणाºया आणि अगदी पावसाळयाच्या तोंडावर लोणचे घालण्यासाठी घाईगडबड करणाºया महिलांना दहा रुपये किलो प्रमाणे कैºया फोडून देणारेही बाजारात दिसून आले. त्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेकांना जवळपास अडीच महिन्यांतर काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून येत होते. कपड्याची, भांड्याची, मोबाईल शॉपीसह कटलरीची दुकाने बुलडाणा शहरात उघडलेली दिसून आली. बुलडाण्यातील कपडा मार्केट हे प्रसिद्ध आहे. त्यादृष्टीने कोर्ट रोडवर अस्थायी विक्रेत्यांनी तंबूत त्यांची दुकानेही थाटली होती.
कोरोनाची धास्ती असली तरी त्याच्या पासून बचावासाठी काय उपाययोजना व्यक्तीगत स्तरावर कराव्यात, याची जाणीवर आता सामान्य व्यक्तीला झाली आहे. त्यामुळे त्याचे पालन करतच अनेकांनी आपले व्यवहार सोमवारी केले. वास्तविक सोमवारी बुलडाण्यातील बहुतांश दुकाने बंद असतात. मात्र प्रदीर्घ कालावधीनंतर आता दुकाने सुरू झाल्याचे चित्र शहरात होते.
व्यापारीही घेताहेत काळजी
बाजारपेठांमध्ये आता काही प्रमाणात ग्राहकांचा गलबलाट सुरू झाला आहे. पूर्वीसारखी स्थिती नसली तरी त्या दिशेने आता पावले पडत असल्याचे दिसून आले. सराफा बाजारातही पोथ, मणी ओवणाऱ्यांनी सोन्या, चांदीच्या दुकानासमोर आपली दुकाने थाटली असल्याचे दिसून आले.
धार्मिक स्थळे मात्र अद्यापही बंद
जिल्ह्यातील बहुतांश व्यवहार सुरळीत होत असल्याचे दिसून आले तरी बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील धार्मिक स्थळे अद्याप उघडण्यात आली नाहीत. नॉन रेड झोनमधील बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासूनच अनेक व्यवसाय सुरू झाले होते.
सुरक्षीत शारीरिक अंतर, निर्जंतुकीकरण केल्यानंतरच ग्राहकांना दुकानात घेण्यात येत आहे. पाच पेक्षा अधिक ग्राहक ऐका वेळी दुकानात घेतले जात नाहीत. सोबतच सध्याची सकाळी नऊ ते सायंकाळी पाचची वेळ व्यवसायासाठी पुरेशी आहे. प्रसंगी ती एक तासाने कमी केली तरी चालेले, असे बुलडाणा चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष विजय बाफना यांनी सांगितले.