CoronaVirus : वाशिम जिल्ह्यात बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण दीडपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:44 PM2020-10-10T12:44:13+5:302020-10-10T12:44:23+5:30
१ ते ८ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधित ३३७ जणांना कोरोना संसर्ग झाला, तर ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख झपाट्याने खालावत आहे. आजवर जिल्ह्यात एकूण ४८६८ जणांना कोरोना संसर्ग झाला असला तरी, सप्टेंबरच्या अखेरपासून मात्र संसर्गाच्या प्रमाणात सतत घट होत असून, बरे होणाºयाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात १ ते ८ आॅक्टोबरपर्यंत ३३७ जणांना कोरोना संसर्ग झाला, तर ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण हा मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे ३ एप्रिल रोजी आढळून आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यातच कुकसा फाटा ता. मालेगाव येथे दोन आणि मुंबईवरून मालेगावला परत येत असताना सहा जणांना कोरोना संसर्ग झाला. मे व जून महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. तथापि, जुलै महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. आॅगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याचा स्फोट झाला. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार गेल्या आठवडाभराचा विचार करता १ आॅक्टोबर ते ८ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधित जिल्ह्यात केवळ ३३७ लोकांना कोरोना संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले. दुसरीकडे याच कालावधित ५१४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला. बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण दीडपटीपेक्षा अधिक असल्याचे सिद्ध होत आहे. ही बाब जिल्हावासियांसाठी मोठा दिलासा देणारी ठरली आहे.