प्रेतालाही करावा लागला स्मशानासाठी संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:13+5:302021-01-09T04:29:13+5:30
सिंदखेड राजा: स्मशानभूमी नसल्याने तसेच अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या जागेवर एकाने दावा केल्याने युवकाचे प्रेत तब्बल चार तास पडून ...
सिंदखेड राजा: स्मशानभूमी नसल्याने तसेच अंत्यसंस्कार करण्यात येत असलेल्या जागेवर एकाने दावा केल्याने युवकाचे प्रेत तब्बल चार तास पडून हाेते. अखेर पाेलिसांच्या मध्यस्थिने प्रेतावर गावातील दुसऱ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील चिंचोली जहागीर येथे ८ जानेवारी राेजी घडली.
शिवाजी बाबूराव नागरे हा चाळिशीतील तरुण चिंचोली येथील घर सोडून कष्ट करण्यासाठी बीड येथे रहात होता. ऊसतोड मजूर म्हणून काम करणाऱ्या शिवाजीचा त्याच भागात अपघाती मृत्यू झाला. गावात ही घटना कळताच कुटुंब,परिवार दुःखात बुडाले. सरकारी सोपस्कार पूर्ण करून शिवाजीचा मृतदेह चिंचोली येथे शुक्रवारी आणला गेला; पण दुर्दैव येथेही आड आले. गावात ज्या जागेवर अंत्यसंस्कार होतात ती जागा वैयक्तिक मालकीची आहे, असा दावा करून प्रेतावर येथे अंत्यसंस्कार करता येणार नाही, अशी भूमिका गावातील त्या जागा मालकाने घेतली. त्याच्यासोबत त्याचे समर्थकही होतेच.. इकडे शिवाचा मृतदेह खांद्यावरून खाली ठेवून त्याचे नातेवाईक अंत्यसंस्कार कुठे करायचा, या विवंचनेत होते. त्या जागा मालकाला अनेकांनी सांगितलं, पण यात चार तास गेले...मेल्यानंतरही अशी परवड कोणाचीही होऊ नये...अजून वेळ गेला असता तर संघर्ष झाला असता; परंतु सिंदखेड राजा येथील ठाणेदार जयवंत सातव, मंडळ अधिकारी राम बोंद्रे यांनी गावात जाऊन वातावरण शांत केले. गावातील एका ठिकाणी शिवाजीवर अंत्यसंस्कार झाले; पण त्यासाठी चार तास वाट पाहावी लागली. तालुक्यातील चिंचोलीसारख्या असंख्य गावात स्मशानभूमी नसल्याचे असे प्रकार घडत आहेत.