४५0 गावांमध्ये नळ योजनेत भ्रष्टाचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:08 AM2017-08-11T01:08:58+5:302017-08-11T01:09:25+5:30
खामगाव : जिल्ह्यातील १४२0 गावांपैकी सुमारे ४५0 गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या असून, आणखी अनेक गावांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. याबाबत पाठपुरावा करुन भ्रष्ट अधिकार्यांना सळो की पळो करुन सोडण्याचा निर्धार शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यातील १४२0 गावांपैकी सुमारे ४५0 गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आतापर्यंत आल्या असून, आणखी अनेक गावांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे. याबाबत पाठपुरावा करुन भ्रष्ट अधिकार्यांना सळो की पळो करुन सोडण्याचा निर्धार शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला आहे, अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी लोकमतशी बोलताना दिली.
बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक स्थानिक विश्रामगृहावर बुधवार ९ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी लोकमतशी बोलताना सुबोध सावजी यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात आतापर्यंत ४५0 गावांमधून नळ योजनेत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी समितीकडे आल्या असून, यात आणखी वाढ होणार आहे.
शासनाने जनतेची मूलभूत गरज म्हणून नळ योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला; मात्र या योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने नागरिकांना अजूनही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या भ्रष्टाचाराची साखळी स्थानिक पातळीपासून मंत्रालयापर्यंत असून, या भ्रष्ट लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. याकरिता जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन हा महत्त्वाचा मुद्दा हाती घ्यावा व नळ योजनांमध्ये भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा सावजी यांनी व्यक्त केली. शासनाने कोट्यवधीचा खर्च करुनही जिल्ह्यातील सुमारे ९0 टक्के गावांमधील योजना बंद असल्याचे सावजी यांनी सांगितले.
गुड मॉर्निंग पथकाच्या धर्तीवर पथक स्थापन करावे
यावेळी शासनाकडून सध्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदरीमुक्तीसाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन करुन प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये उघड्यावर शौचास बसणार्यांवर पोलीस कारवाई केली जात आहे. याप्रमाणेच नळयोजनांमधील भ्रष्टाचार शोधण्यासाठी पथके स्थापन करुन कोणत्या गावात किती खर्च झाला ? नागरिकांना पिण्याचे पाणी नियमित मिळते का ? याची चौकशी या पथकांमार्फत करुन भ्रष्टाचार्यांना धडा शिकवावा, अशी मागणीही सावजी यांनी यावेळी केली.
१५ ऑगस्टपासून अधिकार्यांना जोड्यांचा अहेर
नळयोजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याबाबत तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत; मात्र अनेक तक्रारकर्त्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप सुद्धा सावजी यांनी यावेळी केला, तसेच समितीच्या आंदोलनाच्या भूमिकेमुळे काही अधिकारी कामाला लागले असून, १५ ऑगस्टपर्यंत आपण ४५0 गावांमधील कामांची माहिती मागितली आहे. ही माहिती न दिल्यास १५ ते २२ ऑगस्ट दरम्यान जुन्या चपला-जोड्यांचा आहेर आपण अधिकार्यांना देणार आहोत, असेही सावजी यांनी सांगितले. तर २६ जानेवारी २0१८ पासून दुसर्या टप्प्यातील आंदोलन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सावजी यांनी दिली.
जीवन प्राधिकरण कार्यालयात आज ठिय्या
जळगाव जामोद नगराला शुद्ध पाणी पुरवठा व्हावा, यासाठी बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या जळगाव जामोद कार्यालयात शुक्रवार, ११ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन करणार आहेत. सकाळी ११ पासून सुरु होणार्या या ठिय्या आंदोलनात समिती सदस्य तथा काँग्रेस नेते रमेशचंद्र घोलप, न.प. चे काँग्रेस गटनेते अर्जुन घोलप व नगरसेवक श्रीकृष्ण केदार हे सुद्धा सहभागी होणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वी सुबोध सावजी यांनी जळगाव तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक बोलाविली होती. त्यामध्ये जळगाव नगराला गोडाडा धरणातून होणारा पाणीपुरवठा हा अत्यंत दूषित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यावेळी गोडाडा धरणावर जावून सुबोध सावजी यांनी पाणीपुरवठय़ाची पाहणीसुद्धा केली होती. संबंधित अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवरुन संभाषण करुन याबाबत त्यांना अवगत केले होते. १0 ऑगस्टपासून जळगाव नगराला शुद्ध पाणीपुरवठा झाला नाही तर ११ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन करण्यात येईल, अशी तंबीही त्यांनी अधिकार्यांना दिली होती. त्यानुसार शुक्रवार, ११ ऑगस्टला ११ वाजेपासून जळगाव जामोद मजीप्रा कार्यालयात हे ठिय्या आंदोलन सुरु होत आहे.