लग्नांमधील खर्चिक पद्धत बाद
By admin | Published: July 12, 2014 12:03 AM2014-07-12T00:03:08+5:302014-07-12T00:14:18+5:30
बावनी पंचायत संस्थेचा पुढाकार : वाल्मीक समाजाला ‘रजत’ नगरीतून नवी दिशा.
अनिल गवई/खामगाव
वाल्मीक समाजाच्या विवाह सोहळय़ांमध्ये होणारा अवास्तव खर्च, चुकीच्या चालीरिती आणि परंपरांना तिलांजली देण्याची सुरूवात बुलडाणा जिल्ह्या तील रजतनगरी खामगावमधून झाली आहे. या समाजाच्या विवाह सोहळ्यांमध्ये पूर्वी वेगवेगळे मान असायचे. या मानांची संख्या कमी करून, येथील बावनी पंचायत बहुउद्देशीय संस्थेने सामूहिक सोहळय़ांवर भर दिला आणि वाल्मीक समाजाला नवी दिशा दिली.
वाल्मीक समाजाच्या विवाह सोहळय़ांमध्ये पूर्वी पाच वेगवेगळे मान दिले जात होते. आगमन, नास्ता, जेवण, लग्न आणि बिदाई हे ते पाच मान होते. आगमनाचा मान एक रुपयांपासून जास्तीत जास्त पाच हजार एक रुपये ठरविण्यात आला. पूर्वी विवाह सोहळ्यात भेटवस्तू देणे बंधनकारक होते. ते आता ऐच्छिक करण्यात आले. याशिवाय मामा-मामी, जावाई यांचे मानही कमी करण्यात आले. आता आगमन, लग्न, आणि बिदाई हे तीनच मान ठेवण्यात आले. अवास्तव खर्च टाळण्यासाठी लग्नात साधे जेवण देण्याचा महत्त्वपूर्ण ठरावही समाजाने घेतला आहे.
सन २00४ पासून महाराष्ट्र वाल्मीक मेहतर बावनी पंचायत बहुउद्देशीय संस्थेने समाजाला एकजूट करण्याची मोहीम संपूर्ण राज्यात राबविली. त्यासाठी प्रत्येक वर्षी अधिवेशन घेऊन, संस्थेचे संस्थापक प्रतापराव निंदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. यावर्षी मे महिन्यात समाजाचे अधिवेशन खामगाव येथे घेण्यात आले.
या अधिवेशनात विवाह सोहळय़ांमधील खर्चिक परंपरांना तिलांजली देण्याचा ठराव घेण्यात आला. आता खामगावात झालेल्या ठरावानुसारच देशभरात विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. त्यामुळे विवाहाच्या खर्चात बचत होत आहे. लग्नासाठी कर्ज घेण्याची वेळ कुणावरही येणार नाही, याची विशेष खबरदारी बावनी पंचायतने घेतली आहे.
वाल्मीकी मेहतर समाज बावनी पंचायतीचे अध्यक्ष प्रतापराव निंदाने यांनी मेहतर समाजाचे राष्ट्रीय पातळीवरील पहिले अधिवेशन २0१२ साली पार पडले तर लग्न सोहळ्यातील अवास्तव खर्चाला फाटा देत राष्ट्रीय पातळीवरील पहिला सामूहिक विवाह सोहळा खामगावात २0१४ साली पार पडला असल्याचे सांगीतले.
*राज्यात दहा हजाराच्यावर विवाह
२00६ पासून बावनी पंचायतने खर्चिक विवाह पद्धतीला फाटा दिला. तेव्हापासून राज्यात दहा हजाराच्यावर विवाह सोहळे पार पडले. या सोहळय़ांमध्ये अवास्तव खर्च टाळण्यात आले. हा खर्च आणखी कमी करण्यासाठी बावनी पंचायतने यावर्षीपासून राष्ट्रीय सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याचा पायंडा पाडला आहे.