कपाशीची लागवड घटली!

By admin | Published: May 15, 2017 12:10 AM2017-05-15T00:10:09+5:302017-05-15T00:10:09+5:30

भूजल पातळी खालावल्याने शेतकऱ्यांनी फिरवली मान्सूनपूर्व लागवडीकडे पाठ

Cotton plantation decreased! | कपाशीची लागवड घटली!

कपाशीची लागवड घटली!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनाळा : सोनाळा परिसरासह संग्रामपूर तालुक्यातील भूजल पातळी खोल गेल्याने विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. पर्यायाने बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लावण्यात येणारे मान्सूनपूर्व कपाशीचे पीक धोक्यात आले. बोटावर मोजण्याइतके शेतकरीच कपाशी लागवड करणार आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकरी वर्गाची भयावह परिस्थिती आहे.
सोनाळा परिसरात तसेच संग्रामपूर तालुक्यात बागायती क्षेत्र आहे. त्यामुळे शेतकरी मे महिन्यात कपाशी पिकाची लागवड करतो. दरवर्षी या भागात बागायतदार शेतकरी वर्ग कपाशीचा पेरा जास्त प्रमाणात करीत असतो. यात मान्सूनपूर्व पेरा हा जास्त असतो. मे महिन्यात कपाशी पिकाची मान्सूनपूर्व लागवड शेतकरी करतात. या पिकासाठी पेरणीपूर्व मशागत व पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते. कपाशीची लागवड करण्यापूर्वी स्प्रिंक्लरद्वारे पाणी दिले जाते. सऱ्या काढल्या जातात. विशेष अंतर दोन पऱ्हाटीमध्ये उभे व आडवे ठेवले जाते. नंतर कपाशीची लागवड केली जाते. बिजांकुर उगविण्यासाठी पाण्याचे नियोजन पद्धतशीरपणे करणे महत्त्वपूर्ण आहे. कारण उन्हाळ्याच्या दिवसात पाणी द्यावे लागते. नाहीतर बिजांकुर उगवून कोंब मरु शकतो.
पण, यावर्षी संग्रामपूर तालुक्यातील विहिरी व कूपनलिका यांनी तळ गाठला आहे. गेल्या तीन वर्षांपासून पाऊस कमी होत असल्याने गंभीर परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने मान्सूनपूर्व कपाशीच्या पेरणीचा वांधा झाला आहे. सुरुवातीला स्प्रिंक्लर व नंतर ठिबक सिंचन पद्धतीचा वापर पाणी वाचविण्यासाठी करतात; परंतु काही शेतकऱ्यांजवळ ठिबक सिंचनसुद्धा नाही. एकंदरित शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे, तर दुसरीकडे निसर्गाने पाठ फिरविली आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. आजरोजी अंदाजे कूपनलिका २५० ते ३०० फूट खोल गेल्या आहेत व त्यामधून उपसा अल्पशा प्रमाणात राहतो; पण कपाशीला पाणी भरपूर प्रमाणात लागते. बागायती असून, अल्पपाणी असल्यामुळे कपाशी लागवडीसाठी शेतीची पूर्वमशागत होऊन सुद्धा केवळ पाणी नसल्यामुळे कपाशीची लागवड थांबली आहे.
मे महिन्यात १० तारखेच्या पुढे लागवड केल्या जाते; परंतु पाणी नसल्यामुळे शेतकरी हतबल ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ पाणी आहे ते सुद्धा अल्प प्रमाणात मान्सूनपूर्व कपाशी पेरत आहेत. कारण क्षेत्र जरी जास्त असले, तरी पाणी कमी असल्यामुळे शेतकरी उदासीन होत आहे. दुसरीकडे पाण्याची पातळी खोल जात असल्यामुळे शासनासोबत निसर्गसुद्धा शेतकऱ्यांवर संकटे ओढवित आहे, एवढे मात्र खरे.

जलयुक्त शिवारची कामे व ठिबक सिंचनाची गरज
सोनाळा परिसरात जलयुक्त शिवारची कामे कमी आहेत. या सातपुडा पर्वताच्या भागात नाले भरपूर प्रमाणात आहेत. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहिमेला भरपूर वाव आहे. परंतु जलयुक्त शिवार योजनेतून झालेली कामे ही नाहीच्या बरोबर आहेत. त्यामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याचे यावरुन दिसून येते. एकीकडे शासन जलयुक्त शिवाराचा गाजावाजा करते, तर दुसरीकडे या आदिवासी पट्ट्यात कामे कमी आहेत. या भागात शासनाने अनुदानावर बागायतदार शेतकऱ्यांना ठिबक सिंचन द्यावे, अशी मागणी आहे.

पाण्याची पातळी खोल गेली आहे. यामुळे थोड्या प्रमाणात विहिरी व बोअर चालतात. परिणामी बागायती शेती करणे कठीण झाले आहे. यामुळे भुईमूग, कांदा तसेच फळबागाचे नुकसान झाले आहे. तर आता कपाशीचे पीक सुद्धा वांध्यात आले आहे.
- जगन्नाथ विश्वकर्मा, सधन शेतकरी सोनाळा

Web Title: Cotton plantation decreased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.