मलकापूर येथे कापूस खरेदी झाली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 12:44 PM2020-12-11T12:44:28+5:302020-12-11T12:46:47+5:30
परिस्थिती गंभीर होण्याची शंका असल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली आहे.
- मनोज पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कापूस खरेदी दरम्यान परिस्थिती गंभीर होण्याची शंका असल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या सुमारे १३ हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. सीसीआयच्या केंद्रावर हलक्या प्रतीचा ओलावा असणारा कापूस खरेदी करण्यासाठी सीसीआयच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकणे, तसेच शेतकऱ्यांना भडकावणे असे प्रकार घडून अडचणी निर्माण करण्यात आल्या. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुरक्षेची मागणीही केली आहे.
कापूस विक्रीकरिता जवळपास १४ हजार ५५७ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने बाजार समितीकडे नोंदणी केली. नोंदणीनंतर आतापर्यंत १ हजार ४०० शेतकऱ्यांचा जवळपास ४६ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. दरम्यान, २ डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांना कुण्यातरी व्यक्तीकडून कापूस खरेदी करू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली.
कापूस खरेदीसाठी नोंदणी दरम्यान बाजार समितीच्यावतीने मूळ कास्तकारांचा वास्तविक फोटो न घेता आधार कार्ड व पासबुकची झेरॉक्स प्रत घेण्यात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कास्तकारांच्या सात-बारावर नाॅन एफएक्यू कापूस सीसीआयला विकणे सुरू केले. त्यामुळे व्यापाऱ्यांचा नॉन एफएक्यू दर्जाचा कापूस परत करण्याचे सांगण्यात आले. त्यावेळी संबंधितांनी वजन न करता गाडी लॉक करून जागेवर सोडून देत निघून गेले. या परिस्थितीत सीसीआयच्या केंद्रांवर कापूस खरेदी करणे अशक्य आहे, त्यामुळे ५ डिसेंबरपासूनच कापूस खरेदी बंद करण्यात आली. भारतीय कपास निगम लिमिटेडचे महाप्रबंधक अजयकुमार यांनी कापूस खरेदी सुरळीत सुरू राहावी, यासाठी सुरक्षेची मागणी केली आहे.