शेगाव तालुक्यात कापसाचा पेरा वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:07 AM2017-07-20T00:07:11+5:302017-07-20T00:07:11+5:30
१४ हजार ५० हेक्टरवर कापूस, तर ८ हजार २० हेक्टरवर सोयाबीन
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : तालुक्यात यावर्षी सर्वात जास्त कापसाचा पेरा झाला आहे. यावर्षी सोयाबीन पिकाला शेतकरी वर्गाने दुसऱ्या क्रमांकाची पसंती दर्शविली आहे. तालुक्यात कापसाचा पेरा हा १० हजार ५० हेक्टर, तर सोयाबीन ८ हजार २० हेक्टर झाला आहे. शेतकऱ्यांना चांगल्या दमदार पावसाची आवश्यकता आहे. तालुक्यात ३७ हजार ७२० हेक्टर पेरणी आटोपली आहे.
तालुक्यात यावर्षी पेरणीला सुरुवात लवकर झाली. जवळपास ८० टक्क्यांच्यावर आजमितीला पेरण्या आटोपल्या आहेत. गत दोन ते तीन वर्षांत तालुक्यात सोयाबीन पिकांचा पेरा हा सर्वात जास्त प्रमाणात होता; पण शेतकरी वर्ग हा आता पुन्हा कपाशी पिकाकडे वळला आहे. म्हणजे यावर्षी सोयाबीन पीक हे कमी प्रमाणात तर कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. तालुक्यात तीन दिवसांपासून बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बऱ्याच भागात शेतीची फवारणीची, निंदणाची कामे सुरू आहेत. अशीच पावसाने हजेरी लावली तर तालुक्यात शेतकरी वर्गाने पेरलेल्या पिकांना संजीवनी मिळण्यासारखे होईल. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट हे शेतकऱ्यांवर येणार नाही. महागडे बियाणे विकत घेऊन शेतकऱ्यांनी शेतात पेरण्या केलेल्या आहेत. त्या पिकांना आतो वाढ मिळत आहे. शेतात मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. काही ठिकाणी मजूर मिळत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी तालुक्यात कपाशी पेरा सरासरी पेरणी क्षेत्र १४ हजार ५० हेक्टर, सोयाबीन ८ हजार २० हेक्टर, मूग २४०० हेक्टर पेरणी केले. क्षेत्र उडीद ६६५० हेक्टर, तूर ३००० हेक्टर, ज्वारी ५०० हेक्टर, बाजरी २०० हेक्टर, मका ४०० हेक्टर, तीळ २०० हेक्टर व इतर समावेश आहे. एकूण ३५ हजार ७२० हेक्टर पेरणी आटोपली आहे.
भाव नसल्याने सोयाबीनकडे शेतकऱ्यांची पाठ
तालुक्यात यावर्षी सर्वाधिक कपाशीचा पेरा झाल्यामुळे सोयाबीन या तेलवानाला दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली. २ ते ३ वर्षांपासून शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ केली होती; परंतु त्याला भाव न मिळाल्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. दुसरीकडे सोया तेल हे महाग होत आहे; मात्र सोयाबीनला भाव मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. तालुक्यात पावसाची संततधार जर सुरू राहिली तर पीक चांगले होतील.नाहीतर शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागेल.