विद्युत तारांच्या घर्षणामुळे कापूस पेटला; मजूर जखमी
By Admin | Published: May 11, 2015 02:12 AM2015-05-11T02:12:54+5:302015-05-11T02:12:54+5:30
ट्रकमध्ये कापूस भरताना विद्युत तारांना स्पर्श होऊन मजूर भाजला.
धामणगाव बढे ( जि. बुलडाणा): ट्रकमध्ये कापूस भरताना विद्युत तारांना स्पर्श होऊन मजूर भाजला, तर तारांमधून निघालेल्या ठिणगीमुळे कापसाने पेट घेतल्याची घटना शनिवार, ९ मे रोजी सायंकाळी येथे घडली. येथील त्र्यंबक उबाळे यांचा कापूस पंडित फुसे यांनी विकत घेतला होता. शनिवारी सचिन अशोक अस्तुरे हा मजूर ट्रकमध्ये कापूस भरत होता. या वेळी अचानक विद्युत तारांचे घर्षण होऊन कापसाला आग लागली. सचिन अस्तुरे यालाही तारेचा धक्का लागल्याने तो खाली फेकला गेला. भाजल्यामुळे त्याला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळलेल्या अवस्थेत दृष्टीस पडतात. त्याकडे विद्युत वितरण कंपनीचे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यातूनच असे अपघात होऊन नागरिकांना हकनाक जिवावर बेतणारे प्रसंग ओढवून घ्यावे लागतात. याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली.