नगरसेवकाची ‘गांधीगिरी’, कामचुकार कर्मचाऱ्यांचा मुजोरीपणा कायम...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:09 PM2018-07-12T16:09:56+5:302018-07-12T16:11:10+5:30
बुलढाणा : खामगाव येथे वेळेचे बंधन पाळून काम करणे ही कार्यालयीन संहिता असली, तरी परिस्थिती पाहून काम करण्याचे सुत्रच ‘प्रॅक्टिकल आऊटपूट’ देतात, हा अनौपचारिक अनुभव प्रत्येक कार्यालयात दिसून येतो. त्यामुळे निव्वळ वेळेत आणि वेळेतच काम करण्याची बंधने जिथे येतात, तिथे कर्मचारी केवळ वेळ पाळायची म्हणून काम करतात. हाच अनुभव सध्या खामगाव नगरपालिकेत येताना दिसत आहे. नगरसेवकांच्या गांधीगिरीनंतर कर्मचाऱ्यांचा मुजोरीपणा दिसून येत आहे.
कर्मचारी कार्यालयीन वेळेत बाहेर जातात, याला विरोध म्हणून येथील एका नगरसेवकाने वेळेचे बंधन पाळण्याचा संदेश देणारे पोस्टर पालिकेतील प्रत्येक विभागाच्या प्रवेशद्वारावर चिकटविण्याची ‘गांधीगिरी’ केली होती. याचा चांगला परिणाम होण्याऐवजी उलटाच परिणाम दिसून येत आहे. नगरसेवकाची ही गांधीगिरी कर्मचाऱ्यांना चांगलीच जिव्हारी लागली असून कर्मचारी कामांना नाही, तर केवळ वेळेला प्राधान्य देत आपली ‘ड्युटी’ करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. खामगाव नगर पालिकेतील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत दांडी मारताना आढळून आल्याने नगरसेवक सतिश आप्पा दुडे यांनी नगराध्यक्षा तसेच मुख्याधिकारी यांना लेखी कळविले. यावर मुख्याधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावल्या. तरिही, काहीच फरक पडत नसल्याने नगरसेवक सतिश आप्पा दुडे यांनी अखेर गांधीगिरी करण्याचा निर्णय घेतला. दुडेंनी कार्यालयालीन कामकाजाच्या वेळा तसेच कर्मचारी गैरहजर असल्यास त्याबाबत संपर्क करण्यासाठीचा मोबाईल क्रमांक असलेले पोस्टर नगर पालिकेतील विविध विभागांच्या प्रवेशद्वारावर चिकटविले. कर्मचाऱ्यांना वेळेचे महत्व समजेल व नागरिकांची कामे वेळेवर होतील, हा उद्देश त्यामागे होता. परंतु, या गांधीगिरीचा नकारात्मक परिणाम झाला आहे. पोस्टर लावण्यात आल्यापासून कर्मचारी केवळ वेळेचे बंधन पाळण्यासाठीच डयुटी करताना दिसत आहेत. एरव्ही ड्युटीची वेळ संपल्यानंतरही बराच वेळ नगर पालिकेत थांबणारे कर्मचारी आता पावणेसहा नंतर कार्यालयात थांबत नसल्याचे दिसून येत आहे.
सर्वांनाच वेठीस धरण्याचा प्रकार
प्रत्येक कार्यालयात चांगल्या आणि वाईट मानसिकतेने काम करणारे कर्मचारी असतात. परंतु, अशा एक-दोन कर्मचाऱ्यांसाठी सर्वांनाचा वेठीस धरणे बरोबर नाही. खामगाव नगर पालिकेत नेमके हेच सुरू असल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.
संघटनाप्रमुख सत्ताधाऱ्यांसोबत
नगर पालिकेत कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी न.प. कर्मचारी संघटना आहे. मात्र, या संघटनेचे अध्यक्ष कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याची चर्चाही काही कर्मचाऱ्यांमध्ये आहे. संघटनेचे अध्यक्षच जर कर्मचाऱ्यांसोबत नसतील, तर दाद मागायची तरी कोणाकडे असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडला आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे ‘टाईम टू टाईम’ कामकाज
वास्तविक पाहता, दांडीबहाद्दर हा शब्दप्रयोग इतर कर्मचाऱ्यांसाठी केला गेला असताना, मुख्याधिकारी यांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेतल्याचे दिसते. कर्मचाऱ्यांची बाजू म्हणून की काय, मुख्याधिकारीसुध्दा त्यांची ड्युटी आता ‘टाईम टू टाईम’ करीत असल्याचे दिसून येत आहे.