समृद्धी महामार्गाच्या चार एक्झिट पाॅइंटवर समुपदेशन
By संदीप वानखेडे | Published: April 19, 2023 05:30 PM2023-04-19T17:30:35+5:302023-04-19T17:30:52+5:30
समृद्धी महामार्गावर वाढते अपघात राेखण्यासाठी परिवहन विभागाने वेगवेगळ्या उपाययाेजना सुरू केल्या आहेत.
बुलढाणा : समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर अपघातांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे़ नियमांचे उल्लंघन केल्याने माेठ्या प्रमाणात अपघात हाेत असल्याचे समाेर आल्याने समृद्धीच्या चार एक्झिट पाॅइंटवर आता नियमांचे उल्लंघन करणारी वाहने ट्रेस करून चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गावर वाढते अपघात राेखण्यासाठी परिवहन विभागाने वेगवेगळ्या उपाययाेजना सुरू केल्या आहेत़ समृद्धी महामार्गावर वाहने चालवताना नियमांचे उल्लंघन करणारी वाहने आता सिस्टिमद्वारे ट्रेस करण्यात येणार आहेत़ अशा वाहनांचे क्रमांक टाेलनाक्यावरील सिस्टिममध्ये येणार आहेत़ या वाहनांना टाेलनाक्यावरच अडवण्यात येणार आहे़ ही प्रणाली नागपूर, कारंजा लाड, छत्रपती संभाजीनगर आणि शिर्डी या चार एक्झिट पाॅइंटवरील टाेलनाक्यावर कार्यान्वित करण्यात आली आहे़
या विषयावर हाेणार समुपदेशन
समृद्धी महामार्गावर निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगात वाहने चालवले, लेन कटिंग, टायर आदींसह इतर बाबींवर चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे़
तर बूम बॅरियर खुलणारच नाही.
एखाद्या वाहनाने नियमांचे उल्लंघन केल्यानंतर यंत्रणा कार्यान्वित हाेणार आहे़ वाहनाचा प्रवेश झाल्यानंतर टाेलच्या सिस्टिमध्ये त्याची नाेंद हाेते़ त्यानंतर ते वाहन चार एक्झिट पाॅइंटवर पाेहचलेल्या वेळेवरून वेगमर्यादेचे उल्लंघन केले किंवा हे ठरणार आहे़ टाेलनाक्यावर बूम बॅरियर खुलणारच नाही़ त्यानंतर सायरनचा आवाज हाेणार आहे़ त्यानंतर हे वाहन बाजूला घेऊन चालकाचे वाहन निरीक्षक समुपदेशन करणार आहेत़