औरंगाबाद-वाळूज मार्गावर अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील दाम्पत्य ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 03:32 PM2020-09-04T15:32:18+5:302020-09-04T15:32:54+5:30
अपघातामध्ये अॅड. अमोल रामधन हिरोळे आणि त्यांची पत्नी प्रियंका ( रा. पोरज, ता. खामगाव) हे दोघे ठार झाले.
बुलडाणा: औरंगाबाद-वाळूज मार्गावर दुचाकीला जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्येखामगाव तालुक्यातील पोरज (रोहणा) येथील पती-पत्नी ठार झाल्याची घटना तीन सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी जीप चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघातानंतर जीप चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
अपघातामध्ये अॅड. अमोल रामधन हिरोळे आणि त्यांची पत्नी प्रियंका ( रा. पोरज, ता. खामगाव) हे दोघे ठार झाले. तर त्यांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेले बबनराव जाधव (रा. भीमनगर) यांचे मृतक हे जावाई होते. तीन सप्टेंबर रोजी रात्री हा अपघात घडला. हे दोघे औरंगाबाद येथील आपल्या नातेवाईकाची भेट घेवून वाळूज येथे परत जात असताना त्यांच्या दुचाकीला (एमएच-२०-डब्ल्यू-९८१३) जीपने (एमएच-२०-एएस-५४४४) मागील बाजूने जबर धडक दिली. त्यात या दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. औरंगाबाद-वाळूज-पंढरपूर दरम्यान ही घटना घडली होती. सुदैवाने या अपघातामध्ये दुचाकीवर असलेला त्यांचा चिमुकला मुलगा बचावला असला तरी तो गंभीर जखमी आहे. अॅड. अमोल रामधन हिरोळे हे औरंगाबाद खंडपीठात वकीली करत होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर औरंगाबाद छावणी पोलिस ठाण्याचे एपीआय सचीन वायाळ व त्यांचे सहकारी हे त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्यांनी मदत कार्य केले. अपघातानंतर जीप चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेचा पुढील तपास एपीआय सचीन वायाळ हे करीत आहेत. मृतक पती-पत्नी हे मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येत असलेल्या पोरज (रोहणा) येथील रहिवाशी होते.
पोरज गावात शोककळा
या अपघाताची माहिती मिळताच पोरज गावात शोककळा पसरली आहे. मृत पती-पत्नीवर मुळ गावी पोरज येथे चार सप्टेंबर रोजी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.