खामगावातील कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:42 AM2021-02-18T11:42:36+5:302021-02-18T11:43:08+5:30
Covid Hospital in Khamgaon ५० बेडची क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयात आणखी दहा बेड वाढविण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे खामगाव येथील ५० बेडची क्षमता असलेल्या कोविड रुग्णालयात आणखी दहा बेड वाढविण्यात आले आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत येथील मनुष्यबळ कमी पडत असल्याने उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर पुन्हा कोविडचा भार वाढल्याचे दिसून येत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यानंतर कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट पाहावयास मिळाली. परिणामी जिल्ह्यातील जवळपास सर्वच कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. सौम्य लक्षणे किंवा लक्षणेच नाहीत, अशा रुग्णांचा घरीच उपचार सुरू झाला. त्यानंतर मागील आठवडाभरात जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोना संसर्गाचा फैलाव झपाट्याने दिसू लागला. उपजिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ झाल्याने मागील पाच दिवसांतच रुग्णालय प्रशासनाने कोविड रुग्णालयात आणखी १० बेड वाढविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत रुग्णांची संख्या वाढत असूनही सुरक्षेबाबतची सतर्कता वाढलेली दिसत नाही. त्यामुळे परिस्थिती अशीच कायम राहिली तर मार्च महिन्यापर्यंत आणि मार्चनंतर रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोकाही नाकारता येत नाही.
घाटाखालील सहा तालुक्यांतील रुग्ण
घाटाखालील सहा तालुक्यातील कोरोना रुग्ण खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये खामगाव, नांदुरा, मलकापूर, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेचा ताण वाढत आहे.