खळेगाव येथे गोठ्याला आग, दीड लाखाचा ऐवज खाक
By संदीप वानखेडे | Published: June 13, 2023 05:47 PM2023-06-13T17:47:45+5:302023-06-13T17:49:19+5:30
ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.
खळेगाव : लाेणार तालुक्यातील खळेगाव फाट्यावर असलेल्या शेतातील गाेठ्याला आग लागून दीड लाखाचा ऐवज जळून खाक झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता घडली.
खळेगाव येथील शेतकरी गणेश मारोती कऱ्हाड यांचे खळेगाव फाट्याजवळील शेतात घराजवळ गाेठा आहे. या गाेठ्यात त्यांनी शेतीपयाेगी अवजारे व इतर साहित्य ठेवलेले हाेते. मंगळवारी दुपारी १२ वाजता अचानक गाेठ्याला आग लागली. या आगीत शेतीपयोगी असलेले वस्तू, फवारणी पेट्रोलपंप, स्पिंक्लर पाइप, संच केबल, ट्रॅक्टरचे टायर, कापूस पाणी वापरायच्या टाक्या, टिनपत्रे कुटार व इतरही बरेच साहित्य आगीत जळाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी हणवते यांनी पंचासमक्ष पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. गावातील शिवप्रसाद डोईजड, अश्वजित डोईजड, दत्तात्रय इंगळे, अरुण फौजी, संतोष सरदार, समीर पठाण, गजानन डोईजड इत्यादींनी विहिरीवरील मोटार पंप चालू करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे, आग इतरत्र पसरली नाही. कऱ्हाड यांचे या घटनेत माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे, त्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.