गोठ्याला आग, दोन लाखांचे नुकसान, दोनजण जखमी: शेतीच्या साहित्यासह गुरांचा चारा जळून खाक
By ब्रह्मानंद जाधव | Published: March 16, 2023 05:35 PM2023-03-16T17:35:25+5:302023-03-16T17:35:49+5:30
Buldhana News: बुलढाणा तालुक्यात धामणगाव मासरूळ ते वरुड रस्त्यावरील गोठ्याला आग लागून दोन लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीदरम्यान घडली.
- ब्रह्मानंद जाधव
मासरूळ : बुलढाणा तालुक्यात धामणगाव मासरूळ ते वरुड रस्त्यावरील गोठ्याला आग लागून दोन लाख रुपयांच्यावर नुकसान झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. यामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. तसेच शेतीसाठी लागणारे अवजारे, ठिबक सिंचन, एक वर्ष पुरेल एवढा चारा असून या गोठ्यावरील टिन जळून खाक झालेली आहे.
आग विझवताना शेतकरी व त्याच्या मुलाला दुखापत झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मासरूळ येथील गंगाराम पायघन यांचा त्यांच्या घराजवळ गोठा आहे. गोठ्याला बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय या आगीत गोठ्यामध्ये ठेवलेले शेती साहित्यही जळून खाक झाले. गोठ्याला घर लागून असल्याने रामफळ, लिंबाचे झाड, शेतातील मका काढून वाळू घातलेली असून तिचा ढीग सुद्धा थोडाफार जळून नुकसान झाले आहे. यामध्ये जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले आहे. गोठ्याला आग लागल्याची माहिती कळताच मासरूळ येथील माजी सरपंच शेषराव सावळे, मधुकर महाले, पोलीस पाटील देविदास पवार, तलाठी कानडजे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप शिनकर, ग्रामपंचायत सदस्य किरण उगले, नंदकिशोर देशमुख, संभाजीराव देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा करून अहवाल शासनस्तरावर पाठविला.
घरातील कुटुंबाची तारांबळ
मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीमुळे पायघन कुटुंबाची तारांबळ उडाली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी गंगाराम पायघन यांचे मुले व पत्नी, सुना आणी त्यांचा मुलगा सर्व कुटूंबांनी धडपड केली. दरम्यान, आगीच्या या रौद्र रूपात दोनजण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी धावून शेतातील मोटर पंप चालू करून आग आटोक्यात आणली. या घटनेत शेतकऱ्याचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पीडित शेतकऱ्याला मदतीची मागणी केली जात आहे.