पिंप्री गवळी येथील तलावाच्या भिंतीला तडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:31 PM2019-11-05T13:31:29+5:302019-11-05T13:31:36+5:30
धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून या धरणाच्या भिंतीची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
खामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी हे गांव धरणाखाली वसलेले आहे. धरणाच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले असल्याची बाब २ नोव्हेंबर रोजी काही मच्छिमारांच्या निदर्शनास आली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून गावक-यांनी आपला जीव धोक्यात घालून २ नोव्हेंबरची रात्र जागून काढली.
सरपंच तथा गावकऱ्यांनी याबाबत तहसिलदारांना माहिती दिली असता शासनातर्फे तलाठी डिवरे यांनी पिंप्री गवळी येथे जाऊन पाहणी केली असता तलावाच्या भिंतीला अनेक ठिकाणी मोठ मोठे तडे गेले असल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच ३ नोव्हेंबर रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दुपारी पिंप्री गवळी येथे जाऊन गावकºयांसह धरणावर पोहोचुन पाहणी केली व ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांना धीर दिला. या भिंतीवर अनेक ठिकाणी तडे गेलेले असून पाटबंधारे व महसूल विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून धरणाच्या भिंतीचा सर्व्हे करुन त्यावर असलेली झाडे तोडून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सानंदांनी केली. भविष्यात धरण फुटुन प्राणहानी, वित्तहानी झाल्यास त्यास सर्वस्वी शासन, प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा सानंदा यांनी दिला. अतिपावसामुळे मागील एक महिन्यापुर्वीच पिंप्रीगवळी येथील धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. जेव्हापासून पिंप्री गवळी येथे या धरणाची निर्मिती झाली, तेव्हापासून या धरणाच्या भिंतीची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.