नांद्राकोळीच्या २0 जणांवर गुन्हा
By admin | Published: March 11, 2016 02:53 AM2016-03-11T02:53:12+5:302016-03-11T02:53:12+5:30
अविश्वास प्रस्ताव प्रकरणी नऊ जणांना जामीन मिळाला.
बुलडाणा : तालुक्यातील नांद्राकोळीचे सरपंच यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव सभेसाठी आलेल्या ८ ग्रामपंचायत सदस्यांवर तसेच उपस्थित पोलिसांवर सरपंच सर्मथकांनी हल्ला केल्याची घटना ९ मार्च रोजी घडली. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांत रात्री उशिरा २0 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी ९ लोकांना अटक करण्यात आली. नांद्राकोळी ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्यांनी डॉ. हरिदास रामकृष्ण काळवाघे यांना सरपंच म्हणून निवडले. मात्र, सरपंच काळवाघे अन्य ग्रा.पं. सदस्यांना विश्वासात न घेता, मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करीत नांद्राकोळी येथील १0 ग्रा.पं. सदस्यांनी बुलडाणा तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला. तहसीलदार बाजड यांनी अविश्वास प्रस्तावावर ९ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी २ वाजता बैठकीचे आयोजन केले. निर्धारित वेळेच्या १0 मिनिटाआधी या सभेत सहभागी होण्यासाठी एमएच २८ व्ही ६१६७ क्रमांकाच्या क्रुझर जीपने ८ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत भवनात पोहोचले. दरम्यान, तेथे उपस्थितीत सरपंच सर्मथकांनी जीपवर हल्ला करून आत बसलेल्या ग्रा.पं. सदस्यांना मारहाण करणे सुरू केले. बचावासाठी पोलीस कर्मचारी धावले असता, त्यांनाही सर्मथकांनी मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस पथकासह गावात दाखल झाले. या प्रकरणी काल रात्री उशिरा ग्रामपंचायत सदस्य मनोज सुभाष जाधव यांच्या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी सरपंच डॉ.हरिदास काळवाघे, मंगला तायडे यांच्यासह २0 लोकांवर भादंविच्या १४३, १४७, १४८, १४९, ३६३, ४४७, ४२७, ३२३, ५0६ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.