तुमसर एसडीओचे लोकेशन व्हाॅट्सॲपवर शेअर करणाऱ्या २२ जणांवर गुन्हा, धक्कादायक प्रकार उघड
By ज्ञानेश्वर मुंदे | Published: October 28, 2022 12:00 AM2022-10-28T00:00:13+5:302022-10-28T00:01:05+5:30
Crime News: उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचे लोकेशन व्हाॅट्सॲप ग्रुपवर शेअर केल्याप्रकरणी रेती तस्कारांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपमधील २२ जाणांवर तुमसर ठाण्यात गुरुवारी रात्री १०.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा - उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचे लोकेशन व्हाॅट्सॲप ग्रुपवर शेअर केल्याप्रकरणी रेती तस्कारांच्या व्हाॅट्सॲप ग्रुपमधील २२ जाणांवर तुमसर ठाण्यात गुरुवारी रात्री १०.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती रेती तस्कारांना देण्यासाठी व्हाॅट्सॲप ग्रुप तयार करणे महागात पडले.
तुमसरचे उपविभागीय अधिकारी गुरुवारी रात्री पोलीस व महसूल पथकासह तामसवाडी ते डोंगरला मार्गावर गस्त घालात होते. रात्री ८.३० वाजता रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर चालकाने पथक पाहून ट्राॅलीतील रेती रस्त्यावर खाली केली. त्याच वेळी पथक कारवाईसाठी आल्याची माहिती ट्रॅक्टर चालकाने व्हाॅट्सॲप ग्रुपवर शेअर करुन उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती दिली. सिंघम मॅडम व आरपार काम या नावाने असलेल्या ग्रुपमधील २२ रेती तस्करांना पळून जाण्यासाठी ही माहिती प्रसारित केली. हा प्रकार माहित होताच तलाठी ओमप्रकाश भुरे यांनी तुमसर ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन ट्रॅक्टर चालक-मालक श्याम रतनलाल पटले याच्यासह ग्रुपमधील २२ रेती तस्करांवर भादंवि ३७९, १०९, १२०(ब), २०१, १८६ कलमांसह जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) आणि मोटर वाहन कलम ५०/१७७ अन्वये गुन्हा नोंदविला. रेती तस्करी प्रकरणात एखाद्या व्हाॅट्सॲप ग्रुपच्या सदस्यांवर गुन्हा नोंदविण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई होय. पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात तुमसर पोलीस तपास करीत आहेत.