खामगाव उपजिल्हा रुग्णालय तोडफोड प्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:52 PM2018-02-28T13:52:18+5:302018-02-28T13:52:18+5:30
खामगाव: येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाच्या तोडफोड प्रकरणी चौघांजणाविरोधात मंगळवारी उशिरारात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
खामगाव: येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाच्या तोडफोड प्रकरणी चौघांजणाविरोधात मंगळवारी उशिरारात्री गुन्हा दाखल करण्यात आला. गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करीत मंगळवारी सायंकाळी ७.४५ वाजता तोडफोड केली होती.
स्थानिक शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शेगाव तालुक्यातील आडसुळ येथील सौ. मनिषा कंकाळ या गर्भवती महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच या महिलेचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला होता. या घटनेची माहित मिळताच मृतक महिलेच्या पतीसोबतच नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली होती. त्याचप्रमाणे कर्तव्यावर असलेल्या डॉ. सचिन गाडेकर यांना मारहाण करीत सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा सामान्य रुग्णालयात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. त्यानंतर डॉ. सचिन छगनराव गाडेकर (वय ३५) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी एकनाथ कंकाळ, एकनाथ कंकाळ यांच्या भावासोबत आणखी दोघांविरोधात कलम ३५३, ३३२, ४२७, ३४ भादंवीनुसार व सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा सह कलम (३) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय ठाकूर करीत आहेत.
हृदयगती मंदावल्याने महिलेचा मृत्यू !
उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाख करण्यात आलेल्या गर्भवती महिलेची हृदयक्रिया कमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, महिलेच्या मृत्यूची माहिती दिल्यानंतर मृतक महिलेचा पती एकनाथ कंकाळ आणि त्यांच्या नातेवाईकांकडून उप जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता कक्षाची तोडफोड करून, शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी डॉ. गाडेकर यांनी पोलिसांत तक्रार दिली.