भाजपच्या दोन्ही गटांतील दोनशेहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा
By सदानंद सिरसाट | Published: June 1, 2024 03:40 PM2024-06-01T15:40:20+5:302024-06-01T15:42:27+5:30
मलकापुरात जमावबंदी कायद्याचे उल्लंघन.
सदानंद सिरसाट, मलकापूर (बुलढाणा) : अविश्वास ठराव विशेष बैठक सभागृहाबाहेर चांगलीच गाजली. शुक्रवारी दगडफेक व हुल्लडबाजीत सौम्य लाठीचार्ज झाला. त्यात तीन पोलिस जखमी झाले. जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या दोन्ही गटांतील दोनशेहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. माजी आमदार चैनसुख संचेती यांना आरोपी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मलकापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी विशेष बैठक ३१ मेरोजी आयोजित होती. त्या निमित्ताने उपविभागीय दंडाधिकारी मलकापूर यांच्या आदेशानुसार बाजार समिती उपबाजार परिसरात कलम १४४ (१) अन्वये जमावबंदीचा आदेश होता. त्यात नांदुरा रस्त्यावर तहसील चौक ते रामवाडी परिसर अशा मर्यादा निश्चित केल्या होत्या.
दरम्यान, ३१ रोजी सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास जिल्हा बँकेसमोर गैरकायद्याची मंडळी जमवून काहींनी संचालक मंडळ बसलेल्या लक्झरी बस (एमएच १२ यूएम ७२११) हे वाहन घोषणा देत अडविले. गाडीवर धक्काबुक्की केली. तेवढ्यात दगडफेक केली. त्यात शेख फैजल शेख खलील, सचिन संजय कवळे, प्रकाश भगवान जाधव हे पोलिस कर्मचारी जखमी झाले.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर वरगे यांच्या फिर्यादीवरून विजय कडू पाटील, अजय पुरुषोत्तम तायडे, केशव गारमोडे, चंद्रशेखर रमेश तायडे, शंभू शिवचंद्र तायडे, अमोल वामनराव तायडे, राजू मधुकर तायडे, सागर मनोज जैस्वाल, राहुल घाटे आदींसह २०० जणांविरुद्ध कलम १८८, ३४१, १४३, १४७, १४९ भादंवि तसेच १३५ मुपोकाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास राहुल वरारकर करीत आहेत.
- आरोपींमध्ये माजी आमदारही
जमावबंदी कायद्याचे उल्लंघन करून बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर घोषणा दिल्या. पोलिस अधिकाऱ्यांनी माजी आमदार व त्यांच्या समर्थकांना शांतता भंग करू नका, असे आवाहन केल्यानंतरही त्यांनी गोंधळ सुरू ठेवला. याप्रकरणी मनोज उमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चैनसुख संचेती, यश सुरेशकुमार संचेती, राहुल ऊर्फ बबलू देशमुख, अतुलसिंह प्रतापसिंह राजपूत, संदीपसिंह नारायणसिंह राजपूत, शुभम संजय काजळे, ऋषिकेश ज्ञानदेव वाघोदे, करणसिंह राजपूत, चंद्रकांत वर्मा असे ९ व १५ ते २० बाउन्सर (खासगी अंगरक्षक) अशा २९ जणांविरुद्ध कलम १४३, १८८ भादंवि व मुपोका १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक मुसळे करीत आहेत.