उडीद खरेदी प्रकरणात तिघांवर बुलडाण्यात गुन्हे दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:41 AM2018-02-09T00:41:18+5:302018-02-09T00:42:56+5:30
चिखली : नाफेडच्या उडीद खरेदीमध्ये गैरप्रकारे उडीद विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी मार्केटींग अधिकारी पंढरीनाथ शिंगणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : नाफेडच्या उडीद खरेदीमध्ये गैरप्रकारे उडीद विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी मार्केटींग अधिकारी पंढरीनाथ शिंगणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
नाफेडच्या उडीद खरेदीमध्ये चिखली आणि बुलडाण्यात प्रचंड अपहार झाला असून, शेतकर्यांच्या नावावर व्यापारी, दलालांनी तूर विकली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समितीचे गठन करून चौकशीला सुरुवात केलेली आहे. दरम्यान, बुलडाणा येथील खरेदी केंद्रावर तीन शेतकर्यांनी २९ डिसेंबर २0१७ पूर्वी शासकीय उडीद खरेदीत गैरप्रकार करून शासनाची ३ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघड झाल्याने प्रभारी मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांनी बुलडाणा पोलिसांत ७ फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी नागेश गजानन बाहेकर, समाधान तेजराव बाहेकर, विजय राघोजी बाहेकर रा.किन्होळा यांच्याविरुद्ध अप.क्र.७३/१८ कलम ४२0, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कवास करीत आहेत.
आरोपींची संख्या वाढणार
चिखली आणि बुलडाणा या दोन्ही उडीद खरेदी केंद्रावर गैरप्रकारे उडीद विक्री करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणच्या उडीद खरेदीची कसून चौकशी सुरु आहे. प्रथम टप्प्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, आणखीही काही जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या कारवाईमुळे उडीद खरेदीत अपहार करणार्यांचे धाबे दणाणले आहे.