अवैध व्यवसायाची माहिती गुन्हे विभागाला कळते, स्थानिक पोलिसांना का नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:35 AM2021-03-31T04:35:08+5:302021-03-31T04:35:08+5:30
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात तीन पोलीस स्टेशन आहेत. या पोलीस स्टेशन हद्दीत अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. या व्यवसायाची ...
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात तीन पोलीस स्टेशन आहेत. या पोलीस स्टेशन हद्दीत अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. या व्यवसायाची गोपनीय माहिती बुलडाणा येथील गुन्हे शाखेच्या पथकाला मिळते, मग स्थानिक पोलिसांना का मिळत नाही, असा सूर आता जनतेतून उमटू लागला आहे.
तालुक्यातील साखरखेर्डा, किनगावराजा, सिंदखेडराजा या ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत. तालुक्यात साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा, सिंदखेडराजा, जांभोरा, सोनोशी ही मोठी गावे आहेत. एकूण १०५ गावे तालुक्यात आहेत. या महिन्यात साखरखेर्डा येथे गुटखा जप्त करण्यात आला. जुगार अड्ड्यावर छापा टाकला. दारूची अवैध विक्री करताना अनेकांना अटकही केली. ही कारवाई बुलडाणा येथील गुन्हे शाखेच्या पथकाने केली. साखरखेर्डा येथे गुटखा आजही खुलेआम विकला जातो. वरलीची दुकाने चौकाचौकात सुरू आहेत. गोरेगाव, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा येथेही वरली सुरू आहे. शिवजयंती शांततेत साजरी व्हावी यासाठी सर्व पोलीस पाटलांनी बैठकीतच अवैध दारूविक्री करणाऱ्यांची नावे देऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. काही विक्रेत्यांवर कारवाई झाली. परंतु कारवाईनंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या प्रमाणे अवैध दारूविक्री सुरू झाली. गुटखा विक्री कायमच आहे. वरली तर पुढाऱ्यांची मक्तेदारी झाली आहे. काल, परवा एका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल १६ व्यक्तींना अटक केली होती. खरे तर रात्रीची संचारबंदी लागू असताना हे लोक एकत्र बसले कसे? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. आज साखरखेर्डा येथे रहदारीच्या ठिकाणी अवैध दारूविक्री सुरू आहे. जाफराबाद मोहल्ल्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ती टपरी तेथून हटवून दारूविक्री बंद करावी, अशी मागणी केली आहे. परंतु आजही खुलेआम दारू विकली जात आहे. गोरेगाव फाटा, गोरेगाव, पांग्रीकाटे, लिंगा, सायाळा, राजे गाव, शिंदी, राताळी, मोहाडी, गुंज, वरोडी, सवडद, दरेगाव, हिवरा गडलिंग, हनवतखेड, झोटिंगा वाघाळा या गावातही अवैध दारूविक्री सुरू आहे. तेथील स्थानिक सरपंच, महिला मंडळ यांनी निवेदन देऊनही कारवाई होत नाही.
.......कोट.......
पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या अनेक अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई केली आहे. जुगार अड्डे जेथे कोठे चालू असतील त्याची गोपनीय माहिती द्यावी. लगेच कारवाई करण्यात येईल.
- जितेंद्र आडोळे, ठाणेदार, साखरखेर्डा