अबब... पती, पत्नीने लहान मुलाला घेवून केली दुचाकीची चोरी
By विवेक चांदुरकर | Published: December 6, 2023 05:37 PM2023-12-06T17:37:42+5:302023-12-06T17:39:20+5:30
अकोल्यातील पती, पत्नीने चाेरल्या सहा दुचाकी, मलकापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या.
विवेक चांदूरकर,मलकापूर : अकोल्यातील पती, पत्नीला मलकापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पध्दतीने नांदुरा नाक्यावर अटक केली. अटकेत असलेल्या पतीपत्नीने वेगवेगळ्या ठिकाणांहून सहा दुचाक्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी चोरट्या पती पत्नीसोबतच त्यांचा लहान मुलगाही होता.
येथील बुलढाणा रस्त्यावरील शास्त्री नगरातील रहीवाशी सुधाकर रामचंद्र मंडवाले त्यांच्या राहत्या घराच्या छतावर उभे होते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोरून त्यांची एम. एच. २८, ए.एल.९५३३ क्रमांकाची दुचाकी एक महिला व पुरुष काढून नेत असल्याचे आढळले. त्यांनी आरडाओरडा केली. मात्र चोरी करणारे दाम्पत्य दुचाकी घेऊन गेले. समोर न्यायालय असल्याने त्यांनी अलीकडच्या वळणावर दुचाकी वळवून पोबारा केला. सुधाकर मंडवाले यांनी संपर्क केल्याने पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी तत्काळ डि.बी.पथकाला नांदुरा रस्त्यावर पडताळणीचे आदेश दिले. डी.बी.पथकप्रमुख पोलिस उपनिरीक्षक करुणाशील तायडे, ईश्वर वाघ, प्रदीप गवई, प्रमोद राठोड, गोपाल तारुळकर, संतोष कुमावत, आसिफ शेख, आनंद माने आदींनी नांदुरा रस्त्यावर मोर्चा वळवला. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास डी.बी.पथकाने चोरीच्या दुचाकीसह पतीपत्नीला त्यांच्या बाळासह ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी त्यांची कसून चौकशी केली असता मलकापूर १, शेगांव ४, खामगांव १ व वाशीम १ अशा सहा दुचाक्यांची चोरी केल्याची कबुली अटकेत पतीपत्नीने दिली.
या प्रकरणी पोलिसांनी अकोला शहरातील जवाहर नगरातील रहिवासी श्रीकांत अजाबराव आवारे (वय ३५) व सोनाली श्रीकांत आवारे (वय ३०) या पतीपत्नी विरूद्ध कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत पतीला गजाआड करण्यात आले. लहान बाळामुळे पत्नीला बाहेर ठेवण्यात आले आहे.
दुचाकी चोरीत महिलेचा सहभाग :
मलकापूर येथील शास्त्री नगरातील दुचाकी चोरीच्या घटनेत पतीसमवेत पत्नीचा सहभाग आहे. वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेल्या दुचाकी चोरीत महिला सहभागी असू शकतात हि बाब स्पष्ट झाली आहे.