तीन महिन्यांत ३६ जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:32 AM2021-04-12T04:32:23+5:302021-04-12T04:32:23+5:30
राहेरी बु. : येथून जवळच असलेल्या किनगावराजा पोलीस ठाणे हद्दीतील व हद्दीबाहेरील अवैधरीत्या विक्री होत असलेली दारू पकडली. याप्रकरणी ...
राहेरी बु. : येथून जवळच असलेल्या किनगावराजा पोलीस ठाणे हद्दीतील व हद्दीबाहेरील अवैधरीत्या विक्री होत असलेली दारू पकडली. याप्रकरणी ३६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई किनगारावराजा पोलिसांनी शनिवारी केली.
अवैध दारूविक्री रोखण्यासाठी ठाणेदार सोमनाथ पवार यांनी विशेष मोहीम राबवून जानेवारी ते आजपर्यंत अवैधरीत्या दारू बाळगणारे व वाहतूक करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांनी जानेवारी ते आजपर्यंत अशा तीन महिन्यांच्या कालावधीत ३६ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत २९ हजार ९५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये देशी दारू, गावठी हातभट्टी दारू व मोह सडव्याचा समावेश आहे. या मोहिमेमुळे स्टेशन किनगावराजा पोलीस हद्दीतील व हद्दीबाहेरील अवैधरीत्या देशी दारूविक्री करणाऱ्यांना चांगलीच जरब बसलेली आहे. यापुढे किनगावराजा पोलीस ठाणे हद्दीत देशी दारू व हातभट्टी दारू विक्री करीत असेल तर ठाणेदार सोमनाथ पवार यांना गुप्त माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, अप्पर पोलीस अधीक्षक बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनुने यांनी अवैध दारूविक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार किनगावराजा ठाणेदारांनी उपरोक्त कारवाई केली आहे.