मुख्याध्यापकासह संस्थाध्यक्षाविरुद्ध फौजदारी खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 04:11 PM2020-01-17T16:11:56+5:302020-01-17T16:12:01+5:30
हा खटला शाळेचे तत्कालीन शिक्षक राम बुरंगी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चालणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लाखनवाडा येथील समता बहूउद्देशीय शिक्षण संस्थेव्दारा संचालित गवंढाळा येथील महात्मा ज्योतिबा फुले येथील विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक रामेश्वर राऊत, संस्थाध्यक्ष सौ. आशा राऊत व सचिव महादेव राऊत यांचेविरूध्द शाळा प्राधिकरण, अमरावती यांच्या आदेशाचा भंग केल्याचे आरोप आहे. त्यावरून खामगावन्यायालयात फौजदारी खटला चालणार आहे.
हा खटला शाळेचे तत्कालीन शिक्षक राम बुरंगी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चालणार आहे. प्रकरणात तक्रारकर्ते बुरंगी यांचेतर्फे अॅड. चंद्रशेखर भाटे, अॅड. केतन भाटे व अॅड. भालतडक काम सांभाळत आहेत.
शाळेचे तत्कालीन शिक्षक बुरंगी यांना सेवेतून कमी करण्यात आल्यामुळे त्यांनी याविरूध्द शाळा प्राधिकरण, अमरावती येथे याचिका दाखल केली होती. सदर याचिका मंजुर होवून बुरंगी यांना थकीत पगारासह रूजू करण्याचे आदेश संस्थेला २००९ मध्ये देण्यात आले होते. त्यानुसार बुरंगी यांना ३० सप्टेंबर २००९ रोजी सेवेत रूजू तर करण्यात आले. परंतु थकीत पगार देण्यात आला नाही.
याबाबत अनेकदा बुरंगी यांनी विनंती करूनही वर नमूद आरोपींनी शाळा प्राधिकरणच्या आदेशानुसार थकीत पगार अदा केला नाही. सुमारे ७० हजार रुपये थकीत पगाराची रक्कम आहे. यासंदर्भात बुरंगी यांनी आरोपींविरूध्द खाजगी फौजदारी खटला भरला त्याविरूध्द आरोपींनी खामगाव सत्र न्यायालयात याचिका केली होती. परंतु सत्र न्यायाधिश देशपांडे यांनी आरोपींची याचिका खारीज करून त्यांचेविरूध्द फौजदारी खटला चालविण्याचा आदेश कायम ठेवला. या घटनेमुळे खामगाव तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.