७८ एकर शेतीवर दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:25 AM2021-06-25T04:25:01+5:302021-06-25T04:25:01+5:30
फैजलापूर शिवारातील शेतात शेतकऱ्यांनी शेतामध्ये एका कंपनीचे फाॅस्फेट बियाण्याबरोबर पेरणी केली होती, तर काही शेतामध्ये दुसऱ्या कंपनीचे खत ...
फैजलापूर शिवारातील शेतात शेतकऱ्यांनी शेतामध्ये एका कंपनीचे फाॅस्फेट बियाण्याबरोबर पेरणी केली होती, तर काही शेतामध्ये दुसऱ्या कंपनीचे खत वापरून त्याच बियांच्यासोबत पेरणी केली होती. दोन्ही शेतामधील पेरणीसाठी वापरलेले बियाणे हे एकच होते; परंतु खत वेगवेगळे वापरले होते. यामध्ये ज्या शेतामध्ये सुपर फॉस्फेट खत टाकले, त्या शेतामधील उडीद, सोयाबीन, तूर, मुगाची उगवण झालीच नाही. ज्या ठिकाणी खत पडले नाही त्या ठिकाणी बियाण्याची उगवण योग्य पद्धतीने झाल्याचे दिसून आले. या शेतामधील बियाणे उकरून पाहिले असता त्या बियांना अंकुर आले होते. परंतु, ते खताच्या संपर्कात येऊन ते सडले, तर काही बियाण्यांचे सोटमूळ आहेत. या सोटमुळात गाठ निर्माण झाल्याचे दिसले. त्यामुळे बियाणे सडून गेले आहे. या शेतकऱ्यानी संबंधित कंपनीचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क केला असता कंपनीमधून काही अधिकारी शेतीची पाहणी करण्याकरिता आले होते. त्यावेळेस कृषी अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे; परंतु खताच्या कंपनीकडून अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर या शेतकऱ्यांना मिळाले नाही.
खत, बियाणे देण्याची मागणी
आता पेरणीची वेळ निघून जात आहे. या शेतकऱ्यांना जवळपास ७८ एकर शेतीवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यांच्याकडे कोणतेही बियाणे व खते उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे शेतकरी संकटात सापडले आहे. शासनाने बियाणे व खते देण्याचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतकरी झाले आक्रमक
बोगस खत देणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करून शेतकऱ्याचे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्यात यावे, तसेच या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. कंपनीचा परवाना तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर शारंगधर शेतकरी संघ मेहकरचे योगेश लक्ष्मण म्हस्के, अर्चना योगेश म्हस्के, उदय योगेश म्हस्के, लक्ष्मीकांत खंडागळे, संजय शिंदे, लक्ष्मण शिंदे, महादू शिंदे, सुधीर कांबळे, संतोष म्हस्के, चैतन्य म्हस्के, लक्ष्मण म्हस्के, भगवान शिंदे, संतोष शिंदे, गजानन शिंदे, मीना चौधरी, स्वप्निल मस्के, विकास म्हस्के, देवीदास म्हस्के, मंदा म्हस्के, कपिल म्हस्के यांच्या सह्या आहेत.