तुरीवर मारूका अळीचा प्रादुर्भाव, ८० हजार हेक्टरवरील पीक धोक्यात
By विवेक चांदुरकर | Published: September 8, 2022 03:33 PM2022-09-08T15:33:42+5:302022-09-08T15:34:13+5:30
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ७९ हजार ३५० हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे.
खामगाव :
जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात ७९ हजार ३५० हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली आहे. सध्या पीक परिस्थिती चांगली असतानाच तुरीवर मारूका अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जवळपास ८० हजार हेक्टरवरील पीक धोक्यात आले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
तूर पिकावर जिल्ह्यात काही ठिकाणी मारूका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी चांगले पाऊसमान असल्यामुळे तुरीचे पीक चांगले आहे. पीक वाढीच्या अवस्थेत आहे. लवकरच पीक फुलोरा अवस्थेत येईल. मात्र, सद्यस्थितीत काही शेतांमध्ये तुरीच्या शेंड्यावरील पाने जाळे विणून गुंडाळणारी अळी दिसून आली आहे. फुले धरण्याच्या अवस्थेत ही मारूका अळी फुलांचे तसेच शेंगांचे नुकसान करते. मागील पंधरवड्यातील असणारे पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील मारूका अळीच्या वाढीस पोषक आहे. या वातावरणामुळे तूर पिकाला मारूका अळ्यांपासून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचा उपाय करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या किडीचा पतंग करड्या रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्याने चिटकवून झुपके तयार करून त्या आतमध्ये राहून कळ्या, फुले खाते.
असे करा व्यवस्थापन
या किडीचा जीवनक्रम १८ ते ३५ दिवसांत पूर्ण होतो. किडीच्या व्यवस्थापनासाठी तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत तेथे सर्वेक्षण करून शेतात २० ते २५ ठिकाणी प्रती मीटर ओळीत पाहणी करावी. किडीचा प्रादुर्भाव सरासरी २ ते ३ अळ्या प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास गरजेनुसार कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. यात फ्लूबेडामाईड २० डब्ल्यूजी ६ ग्रॅम किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्रॅम किंवा नोवालूरोन ५.२५ अधिक इंडोक्साकार्ब ४.५० एससी १६ मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.