पिकांचे अतोनात नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:39 AM2017-09-22T00:39:14+5:302017-09-22T00:39:23+5:30
नांदुरा: नांदुरा तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारीसह अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी, बुर्टी, डिर्घी, चांदूर शिवारातील पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: नांदुरा तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे कपाशी, मका, ज्वारीसह अन्य पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी, बुर्टी, डिर्घी, चांदूर शिवारातील पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.
तालुक्यात बुधवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी काही गावात वादळी वार्यामुळे जवळपास सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायती कपाशीची कापूस फुटण्याची अवस्था असून, मक्याचे कणीस भरलेले आहेत, ज्वारीलाही कणसे पडलेली आहेत. त्यामुळे अचानक आलेल्या वादळी वार्यामुळे ही सर्व पिके जमीनदोस्त झाली आहेत. परिसरातील काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी, बुर्टी, चांदूर, डिघी येथे मोठय़ा प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
काटी येथील जवळपास ८0 टक्के शेतकर्यांचे कपाशी, ज्वारी व मका पिके जमिनीवर आडवी झाल्याने शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, पिकांची अशी अवस्था पाहून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
चार गावे सोळा तास अंधारात
बुधवारी सायंकाळी आलेल्या पावसामुळे रात्री ८ वाजेपासून काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी चारही गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तब्बल १६ तास वीज गायब हो ती. गुरुवारी दुपारी १२ वाजता वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. १६ तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिल्याने चारही गावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
बुधवारी सायंकाळी वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे दोन एकरावरील मका व ३ एकरावरील कपाशी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, हाती आलेले पीक गेले आहे. यामध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आता पुढे काय, असा प्रश्न आहेच.
- विष्णू त्र्यंबक हिवाळे, शेतकरी काटी
काटी, धानोरा, विटाळी, सिरसोडी येथील शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, महसूल विभाग, कृषी विभागाने तत्काळ नुकसानीचा सर्व्हे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी.
- योगिता गावंडे, पं.स. सदस्य