पेनटाकळीतून पाझरणाऱ्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:58+5:302020-12-24T04:29:58+5:30
मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पातील पाझरणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यावर ...
मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पातील पाझरणाऱ्या पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे व पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आ. तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात आ. रायमुलकर यांनी म्हटले की, पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून होत असलेल्या पाझरामुळे परिसरातील शेतीचे व पिकांचे नुकसान होत आहे.नुकताच चौथ्या कि.मी.वरील कालवा फुटून ६५ च्यावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकल्पाचे सर्व कालवे खराब झाले असून, वारंवार सूचना देऊनही उपाययोजना करण्यात आली नाही. मुख्य कालव्यातून होणारा पाझर कमी करण्यासाठी सिमेंट काँक्रीटमध्ये अस्तरीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतरही पाझरणारे पाणी नाल्यापर्यंत जाण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे. यासोबतच चरांची खोली वाढवून पाण्याचा निचरा करावा. तसेच केलेल्या चरांची देखभाल व्हावी व सर्व कालव्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. या उपाययोजना तातडीने होणे आवश्यक आहे. पेनटाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सहमतीने सचिवस्तरीय उपसमितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशीत करावे, अशी मागणी आ. संजय रायमुलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेऊन केली आहे. याविषयीचे निवेदन बुधवारी मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना दिले असून, त्यांनी पुढील आठवड्यात खासदार, आमदार व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करतो, असे आश्वासन दिले आहे.