दीड लाखापैकी ४.५0 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2017 02:39 AM2017-01-19T02:39:53+5:302017-01-19T02:39:53+5:30

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील सात हजार शेतक-यांनी उतरविला विमा.

Crop insurance for 4.50 thousand hectare of 1.5 lakh hectare | दीड लाखापैकी ४.५0 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा

दीड लाखापैकी ४.५0 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा

Next

बुलडाणा, दि. १८- जिल्ह्यात १ लाख ४५ हजार हेक्टरवर रब्बीची पेरणी करण्यात आली. या पिकांना सुरक्षेचे कवच मिळावे म्हणून रब्बी हंगाम २0१६-१७ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हय़ात राबविण्यात आली. १८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ३५७ हेक्टर रब्बी क्षेत्राला पीक विम्यातून सुरक्षित करण्यात आले आहे. यात साडेसात हजार शेतकर्‍यांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
जिल्ह्यात सप्टेंबर २0१६ पासून रब्बीची पेरणी करण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर संभाव्य नैसर्गिक आपत्ती, कीड व अळींचा हल्ला, उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान आदी बाबींमध्ये रब्बी पिकांना सुरक्षा मिळावी, तसेच शेतकर्‍यांना त्याची आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, या दृष्टिकोणातून जिल्ह्यात पीक विमा योजनांची घोषणा करण्यात आली. शिवाय पिकांचा विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत ३१ डिसेंबर घोषित करण्यात आली आहे;
मात्र शेतकर्‍यांकडून योजनेस अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे १0 जानेवारी २0१७ पर्यंत पुन्हा योजनेला मुदतवाढ देण्यात आली. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून १८ जानेवारी रोजी प्राप्त अहवालानुसार, पीक विमा योजनेत सहभाग नोंदवित जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील ७ हजार ५४२ शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत ७ लाख ७२ हजार ३३८ रुपयांचा हप्ता भरला आहे. यातून ४ हजार ३५७ हेक्टर रब्बी क्षेत्र सुरक्षित झाले आहे.
शेतकर्‍यांनी भरला ७ लाख ७२ हजार हप्ता
प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २0१६-१७ मध्ये जिल्हय़ामध्ये राबविण्याकरिता नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि.मंडळ कार्यालय, मुंबई कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. १८ जानेवारी रोजी प्राप्त माहितीनुसार, पीक विमा योजनेत शेतकर्‍यांनी ७ लाख ७२ हजार ३३८ रुपयांचा हप्ता भरला आहे. यात बुलडाणा उपविभागात ४ लाख २ हजार ९९५ रुपये, खामगाव उपविभागात १ लाख ६१ हजार ८३0 रुपये आणि मेहकर उपविभागात २ लाख ७ हजार ५१२ रुपये भरले आहेत.
बुलडाणा उपविभागात चांगला प्रतिसाद
जिल्ह्यातील ७ हजार ५४२ शेतकर्‍यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला असून, यात बुलडाणा विभागातील बुलडाणा, चिखली, मोताळा व मलकापूर या चार तालुक्यातून ४ हजार ३६९ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला, तर खामगाव विभागात १ हजार १४२ तर मेहकर विभागात २ हजार ३१ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला.

Web Title: Crop insurance for 4.50 thousand hectare of 1.5 lakh hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.