आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पिकविम्याची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 06:36 PM2021-10-05T18:36:59+5:302021-10-05T18:37:04+5:30
Crop insurance : पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना सन २०२० चा पिक विमा वितरीत करणार नाही अशी भूमिका पीक विमा कंपनीने घेतली होती.
जळगाव जामोद : सन २०२० च्या पीक विम्याची रक्कम येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल असे अभिवचन पिक विमा कंपनीने मंगळवारी झालेल्या बैठकीत कृषिमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या चर्चेदरम्यान दिले.
पीक विमा कंपनी याबाबत वेळकाढूपणा करत असल्याचे शासन व लोकप्रतिनिधी यांच्या लक्षात आले होते.यापूर्वी एक सप्टेंबर रोजी कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाली होती.परंतु त्यावेळी तोडगा निघाला नव्हता.जोपर्यंत राज्यशासन त्यांच्याकडे असलेली पीक विम्याची थकीत रक्कम जमा करीत नाही.तोपर्यंत पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना सन २०२० चा पिक विमा वितरीत करणार नाही अशी भूमिका पीक विमा कंपनीने घेतली होती.त्यावेळी आमदार डॉ.संजय कुटे यांनी जर १५ सप्टेंबर पर्यंत पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात सन २०२० ची पीक विम्याची रक्कम जमा केली नाही तर १६ सप्टेंबरपासून पिक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले जाईल असे जाहीर केले होते.
दरम्यान १६ सप्टेंबरला आ.डॉ.संजय कुटे यांनी मंत्रालयात ठिय्या आंदोलन केले असता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांची मुदत वाढवून मागितली होती.त्यानुसार मंगळवार दि.५ ऑक्टोबर रोजी कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव व जिल्ह्यातील आमदार यांच्या उपस्थितीत पिक विमा प्रतिनिधींची बैठक झाली. त्यामध्ये पिक विमा कंपनीने आपली नकारघंटा कायमच ठेवल्याने पुन्हा पेच निर्माण झाला होता.
संजय कुटे झाले आक्रमक
जोपर्यंत पिक विमा कंपनी शेतकऱ्यांचा सन २०२० चा पिक विमा त्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा करीत नाही तोपर्यंत त्यांना या बैठकीतून जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका आ.डॉ. संजय कुटे यांनी मंगळवारच्या बैठकीत घेतली. त्याला कृषीमंत्री ना.दादाजी भुसे व खा.प्रतापराव जाधव यांनीही पाठिंबा दिला.परिणामी पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी वरिष्ठांशी चर्चा करून येत्या आठ दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल हे मान्य केले.त्यामुळे सात-आठ महिन्यांपासून प्रलंबित असणारा हा प्रश्न अखेर मिटला.