नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:59+5:302021-05-29T04:25:59+5:30

साखरखेर्डा: तालुक्यातील सातही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा ...

Crop insurance awaits the affected farmers - A | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा - A

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा - A

Next

साखरखेर्डा: तालुक्यातील सातही मंडळांत अतिवृष्टी झाल्याने तालुक्यातील १०५ गावांत ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आला. परंतु, शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा रक्कम मिळाली नाही. पीकविमा रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मागील हंगामातील पीकविम्याची रक्कम मिळाली, तर यंदा पेरणीसाठी आर्थिक मदत होऊ शकते.

साखरखेर्डा परिसरात मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक पाऊस पडल्याने सोयाबीन, कपाशी ही पिके उद्ध्वस्त झाली होती. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हिरवा दाना असतानाच कोंब फुटले होते. तर कापसाला बोंडी येऊन कापूस वेचणीला आला होता. अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांनी कपाशी उपटून टाकली. हेक्टरी चार क्विंटल सरासरी निघाल्याने पेरणी, डवरणी, बी, खते, काढणी, मळणी यांचा सरासरी हिशेब केला तर झालेला खर्चही निघाला नाही. पीकविमा काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विमा काढण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांना पाठविले होते. तालुक्यातील ४५ हजार शेतकऱ्यांपैकी २५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा लाभ घेतला होता. पीकविमा काढताना शेतकऱ्यांच्या दारी जाणारे कृषी अधिकारी आज मात्र गप्प का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व १०५ गावांची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असताना शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत नाही. केवळ खरडलेल्या जमिनीचा पंचनामा करून त्यांनाच मदत विमा कंपनीने केली. इतर शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली नाही. शिंदी शिवारातील पाझर तलाव फुटल्याने जवळपास २५ हेक्टर जमीन खरडून गेली होती. त्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही, अशा कितीतरी तक्रारी विमा कंपनीच्या विरोधात तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांच्याकडे केलेल्या आहेत. परंतु, कृषी अधिकारी याची दखल घेत नाहीत.

पीकविमा देण्याची मागणी

कोरोना संक्रमण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेला पैसा रुग्णालयात घालविला. आज खत, बियाणे भरण्यासाठी पैसा नाही. सोने गहाण ठेवून कर्ज काढावे, तर सोनाराची दुकाने बंद आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, अशा बिकट परिस्थितीत शेतकरी अडला असून, पीकविम्याचे हक्काचे पैसे द्यावेत, अशी मागणी वामनराव जाधव, गंभीरराव खरात यांनी केली आहे.

आणेवारी ४८ टक्के आल्यानंतरही विमा कंपनीने सरसकट विमा रक्कम तत्काळ द्यावी. कृषी अधिकारी यांनी त्यासंबंधीची माहिती विमा कंपनीला द्यावी.

तोताराम ठोसरे, उपाध्यक्ष

तालुका सरपंच संघटना.

Web Title: Crop insurance awaits the affected farmers - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.