पीक विम्यासाठी पायपीट संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 03:13 PM2019-06-22T15:13:14+5:302019-06-22T15:14:13+5:30
बँक, विमा कंपनी कार्यालय तसेच कृषी कार्यालयात चकरा मारून शेतकरी हैराण झाले आहेत.
- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : गतवर्षी शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची रक्कम हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही. अनेकांच्या कागदपत्रांमध्ये त्रुट्या असल्याने त्यांची पुर्तता करता-करता शेतकºयांच्या नाकीनऊ येत आहेत. बँक, विमा कंपनी कार्यालय तसेच कृषी कार्यालयात चकरा मारून शेतकरी हैराण झाले आहेत.
खामगाव तालुक्यातील हजारो शेतकºयांना अद्याप पीक विमा मिळाला नाही. बँक खात्यात विम्याची रक्कम जमा झाली का? हे पाहण्यासाठी शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत. परंतु त्यांना खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बँकेतून शेतकरी पुन्हा कृषी कार्यालयाकडे वळत आहेत. येथे त्यांना विमा कंपनी कार्यालय गाठण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यानंतर विमा कंपनी कार्यालयाशी संपर्क केल्यानंतर एक ते दोन महिन्यात रक्कम जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान या सर्व प्रकारात शेतकºयांच्या नशीबी केवळ चकरा मारणे एवढाच उद्योग उरला असल्याचे दिसून येत आहे. सध्या पेरणीचे दिवस आहेत. अनेकांच्या शेती मशागतीची कामे अपुर्ण आहेत. त्यामुळे या दिवसात शेतीची मशागत करण्याचे सोडून शेतकºयांना खामगावात येऊन सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मुळात पीक विमा योजना केंद्र शासनाची, जनजागृती कृषी विभागाची, रक्कम जमा होते बँकेत, आणि चौकशी करावी लागते विमा कंपनीच्या कार्यालयात. त्यामुळे अशा सर्व कार्यालयांच्या वाºया करताना, शेतकºयांची चांगलीच दमछाक होत आहे. शेवटी विमा कार्यालयात जाऊन आल्यानंतर पुन्हा खाली हात परतावे लागत आहे.
यात शेतकºयांना प्रचंड मनस्ताप होत असून याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.
गतवर्षी सन २०१८ मध्ये पीक विमा काढला होता. कागदपत्रांमध्ये त्रुट्या नसतानाही अद्याप पीक विम्याची रक्कम खात्यात जमा करण्यात आली नाही. विमा कंपनीच्या कार्यालयात गेलो असता, १ महिन्यानंतर रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले.
-विठ्ठल भिसे
शेतकरी, आसा-दुधा ता.खामगाव.