संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नूकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 03:57 PM2020-06-27T15:57:59+5:302020-06-27T15:58:07+5:30
शनिवारी दुपारी १ वा. पासून सोनाळा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
संग्रामपूर :- संग्रामपूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात महसूली पाच मंडळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. कवठळ मंडळात ६२ मी मी पावसाची नोंद झाली. पातुर्डा ५५, संग्रामपूर ६४, सोनाळा ७४ तर बावनबिर मंडळात सर्वात जास्त ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात एकूण ६८ मि. मि पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे असंख्य शिवारात प्रचंड शेती पिकांचे नुकसान झाले आहे. लहान नद्या व नाले दुथडी भरून वाहू लागले. बहूतांश ठिकाणी पाझर तलाव भरल्याने ओव्हर फ्लो झाले. अगोदरच बोगस बियाणे मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. आता या पावसामुळे शेकडो हेक्टर वर पेरण्यात आलेल्या विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असंख्य शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. रात्री पडलेल्या या पावसामुळे वान नदीला पहीले पूर गेले असून वानखेड व पातुर्डा या दोन गावातील वान नदीवरील पूल पाण्याखाली गेले होते. तालुक्यातील वानखेड, पातुर्डा, कवठळ, मनार्डी, वरवट बकाल, बावनबीर, संग्रामपूर, सोनाळा सह सर्वच शिवारात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने घरांचे नुकसान झाले असून बहुतांश ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. वरवट बकाल येथील बाजार समितित पाणी घुसल्याने येथे पडून असलेले शेतकऱ्यांचे शेतीमाल पूर्णपणे भिजले आहे. यात गहू, हरभरा, तूर, ज्वारी मका आदी धान्यांचा समावेश आहे. आ. डॉ. संजय कुटे यांनी संग्रामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शनिवारी दुपारी १ वा. पासून सोनाळा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.