कालव्यांद्वारे पाणी न सुटल्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:32 AM2021-04-12T04:32:39+5:302021-04-12T04:32:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : खडकपूर्णा प्रकल्पामधून उपासचिंन कालव्याद्वारे सुटणाऱ्या पाण्याच्या भरवशावर तालुक्यातील देऊळगाव धनगर, रामनगर, भरोसा, कोनड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : खडकपूर्णा प्रकल्पामधून उपासचिंन कालव्याद्वारे सुटणाऱ्या पाण्याच्या भरवशावर तालुक्यातील देऊळगाव धनगर, रामनगर, भरोसा, कोनड खु., व मुरादपूर या परिसरात शेकडो हेक्टरवर पिके उभी आहेत; मात्र, खडकपूर्णा प्रकल्पामधून कालव्यामध्ये टप्पा क्रमांक दोनपर्यंत पाणी सोडण्यात आले असून टप्पा क्रमांक तीनसाठी पाणी सोडण्यात येणार नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आल्याने उपरोक्त भागांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. सदर पाणी न सोडल्यास हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
खडकपूर्णा प्रकल्पामधून उपससिंचन योजनेद्वारे वाकी बु. येथील टप्पा क्रमांक एक, अंचरवाडी येथील टप्पा क्रमांक दोन व तेथून भरोसा येथील पंप हाऊसमधून टप्पा क्रमांक ३ व्दारे देऊळगाव धनगर, भरोसा, कोनड, अमोना, पिंपळवाडी या शिवारात पाणी सोडले जाते. या पाण्याच्या भरवश्यावर टप्पा क्रमांक तीनवर अवलंबून असलेल्या उपरोक्त गावातील शेतकऱ्यांनी पीके घेतली आहेत. मात्र, टप्पा क्रमांक तीनच्या कालव्यात पाणीच सोडण्यात आलेले नाही. परिणामी शेकडो हेक्टरावरील पिके धोक्यात आली आहेत. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कालव्याचे पाणी फक्त टप्पा क्रमांक २ पर्यंतच सोडण्यात येणार आहे, असे सांगितले असल्याने समोर पाणी येत नसल्याने टप्पा क्रमांक ३ वरील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, पाण्याअभावी शेतातील उभी पिके सुकत चालली असून हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. खडकपूर्णा प्रकल्पामधून पाणी सोडण्यामध्ये संबंधित अधिकारी-कर्मचारी भेदभाव करत असल्याचा आरोप शेतकरी करत असून पाण्याअभावी वाळत चाललेल्या पिके वाचविण्यासाठी तातडीने टप्पा क्रमांकच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
कॅप्शन : पाण्याअभावी सुकलेली पिके.
..............................