कोरड्या जमिनीवर तणनाशक फवारल्यामुळे पिकांना ‘शॉक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 11:10 AM2020-07-11T11:10:27+5:302020-07-11T11:10:47+5:30
जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत.
- विवेक चांदूरकर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जमिनीमध्ये ओल नसताना तणनाशकांची फवारणी केल्यामुळे पिकांना शॉक बसला असून, पिके पिवळी पडली आहेत. तसेच पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यामुळेही पिके पिवळी पडली आहेत.
संपूर्ण राज्यात खरीप हंगामाची पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र, गत काही दिवसांमध्ये पिके पिवळी पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर पिकांवर सुद्धा व्हायरस आल्याची अफवा काही भागात पसरली आहे. वºहाडात पावसाने दडी दिली होती. तर काही भागात सुरूवातीपासूनच मुबलक पाऊस झाला नाही. त्यामुळे जमिनीत ओल नसल्याने पिकांची हवी तशी वाढ झाली नाही. त्यातच तण वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी तणनाशकांची फवारणी केली. जमिनीत ओल नसल्यामुळे पिकांना पुरेसे पोषण मिळाले नाही. त्यातच तणनाशकांची फवारणी करण्यात आल्यामुळे पिकांना शॉक बसला. त्यामुळे पिके पिवळी पडली आहेत.
शेतकरी अनेक वर्षांपासून शेतात एकाच पिकाची पेरणी करतात. शेतात पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट केली तर मातीचा पोत सुधारतो. मात्र सातत्याने एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्य मिळत नाही. अमरावती विभागात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबिनची पेरणी करतात. सोयाबिन नगदी पिक असल्यामुळे दरवर्षी एकाच पिकाची पेरणी करण्यात येते. सोयाबिन व मका पिकाला सर्वात जास्त अन्नद्रव्यांची गरज असते. शेतकरी पिकांना नत्र, स्पूरद आणि पालाश (एनपीके) ही मुख्य अन्नद्रव्य देतात. मात्र सुक्ष्म अन्नद्रव्य देत नाहीत. सध्या पिकांना झिंक, मंगल, तांबे, लोह ही सुक्ष्म अन्नद्रव्ये व सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य मिळाले नसल्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडली आहेत. शेतकºयांनी पेरणी करताना युरीया व सिंगल सुपर फॉस्पेट खत दिले तर पिके पिवळी पडत नाहीत.
उगवणीपूर्व तणनाशकांच्या फवारणीकडे पाठ
पिक पेरणी करण्यापूर्वीच उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी केली तर तण उगवत नाही. पिकांची पेरणी केल्यानंतर तसेच तण उगवल्यानंतर लगेच तणनाशकांची फवारणी केली तर पिकांना फटका बसतो. त्यामुळे उगवणीपूर्व तणनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे.
जमिनीत ओल नसताना नणनाशकांची फवारणी करण्यात आली. त्याचा पिकांना शॉक बसल्याने पिके पिवळी पडली आहेत. तसेच शेतात एकाच पिकाची पेरणी केल्यामुळे पिकांना सुक्ष्म अन्नद्रव्ये मिळत नाही. त्यामुळे सुद्धा पिके पिवळी पडतात.
- जी. बी. गिरी
तालुका कृषि अधिकारी, खामगाव